आॅकलंड: इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययात कर्णधार केन विलियम्सनने न्यूझीलंडकडून विक्रमी १८ व्या शतकाची नोंद केली. पावसामुळे केवळ ३२.१ षटकांचाच खेळ शक्य झाला. त्यात ५४ धावा निघाल्या.
विलियम्सनने धावबाद होण्याआधी १०२ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ४ बाद २२९ धावा झाल्या आहे. इंग्लंडवर आतापर्यंत १७१ धावांची आघाडी झाली असून सहा फलंदाज शिल्लक आहेत. इंग्लंडचा पहिल्या डावात ५८ धावात खुर्दा झाला होता. दिवस- रात्री खेळल्या जात असलेल्या या सामन्यात विलियम्सनने ९१ धावांवरुन पुढे खेळ सुरू केला. त्याने अॅण्डरसनच्या चेंडूवर जलद धाव घेत १८ वे शतक गाठले. रॉस टेलर आणि मार्टिन क्रो (प्रत्येकी १७ शतके) यांना त्याने मागे टाकले.
पावसामुळे चहापान वेळेआधी जाहीर करण्यात आले. इंग्लंडकडून सर्वांत यशस्वी गोलंदाज अॅण्डरसन राहीला. त्याने विलियम्सनला पायचित करीत ५३ धावांत तीन गडी बाद केले.
विलियम्सन - निकोल्स यांनी चौथ्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी केली. पावसामुळे दिवसभरातील सुमारे साडेचार तासांचा खेळ वाया गेला. (वृत्तसंस्था)
विलियम्सन सर्वाधिक शतके ठोकणारा
किवी फलंदाज
२७ वर्षांचा केन विलियम्सन हा न्यूझीलंडकडून सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज बनला. त्याने इंग्लंडविरुद्ध १८ वे शतक साजरे केले. ६४ वी कसोटी खेळत असलेल्या केनने ५३१६ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून सहा फलंदाजांनी आतापर्यंत दहा किंवा त्याहून अधिक धावा ठोकल्या असून त्यात टेलर, मार्टिन क्रो,जॉन राईट आणि ब्रँडन मॅक्युलम आदींचा समावेश आहे.