वूस्टरशायरचा डावखुरा फिरकीपटू जोश बेकर ( Josh Baker ) याने वयाच्या २० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आणि या बातमीने इंग्लिश क्रिकेट स्तब्ध झाले आहे. बेकरने २०२१ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी क्लबसोबत पहिला करार केला. त्याने २२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४३ बळी घेतले आणि २५ व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये २७ बळी घेतले होते.  जुलै २०२३ मध्ये ग्लुसेस्टरशायर विरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट ७५ धावांसह त्याने मैदान गाजवले होते आणि त्याच्याकडे भविष्यातील स्टार म्हणून पाहिले जात होते.
 
रेडडिचमध्ये जन्मलेला, बेकर न्यू रोड येथे विविध वयोगटात आपली छाप सोडत पुढे आला आणि इंग्लंडच्या  १९ वर्षांखालील संघाकडून खेळला. गेल्या हंगामात, त्याने नवीन तीन वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली आणि नुकताच सिडनीमध्ये न्यू साउथ वेल्स प्रीमियर लीगमध्ये नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट सीसीसाठी  तो खेळला होता.  "जोशच्या निधनाच्या वृत्ताने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे," असे वूस्टरशायरचे मुख्य कार्यकारी ऍशले जाईल्स यांनी सांगितले. "जोश हा  आमच्या क्रिकेट कुटुंबाचा अविभाज्य भाग होता. आम्हा सर्वांना त्याची खूप आठवण येईल. आमचे सर्व प्रेम आणि प्रार्थना जोशच्या कुटुंबियांसोबत आहेत."
बेकरने  मे २०२२ मध्ये न्यू रोड येथे डरहम विरुद्ध एका षटकात ३४ धावा केल्या. त्यात पाच षटकार आणि एक चौकारचा समावेश होत्या. त्याने ८८ चेंडूंत १६१ धावांची खेळी केली होती. कालही त्याने संघासाठी ३ विकेट्स घेतल्या होत्या.