पेनसिल्व्हेनिया राज्यातील निर्णायक मते मिळवत जो बायडेन ( Joe Biden) यांनी अमेरिका अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेला २७० हा बहुमताचा आकडा गाठला. त्यांच्या खात्यात २८४ प्रातिनिधिक मते (इलेक्टोरल व्होट्स) आहेत. तर ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत. अजूनही काही राज्यांमध्ये मतमोजणी सुरू असली तरी बायडेन हेच अमेरिकेच्या अध्यक्षपदी असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. येत्या २० जानेवारी रोजी बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेतील. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण करतील.
बायडेन अमेरिकेचे नवे अध्यक्ष असतील अशी भविष्यवाणी इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यानं २०१४मध्येच केली होती. अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालानंतर त्याचे जुने ट्विट व्हायरल झाले आहे आणि नेटिझन्सनी त्याचा संबंध जो बायडेन यांच्या विजयाशी जोडला आहे.
राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज आर्चरचे ट्विट नेहमी व्हायरल होतात. जुन्या ट्विट्सचा वर्तमानाशी संबंध जोडून त्याला ज्योतिषाचार्च म्हणूनही बोलावले जाते. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातही जोफ्राचे अनेक जुने ट्विट व्हायरल झाले. त्यात चार चेंडूंत सलग षटकार, आयपीएलमधील सर्वोत्तम कॅच, बेन स्टोक्सची पराक्रमी कामगिरी, वॉर्नरची विकेट अन् Xbox जिंकणे, आदी अनेक ट्विट व्हायरल झाले. तसाच एक ट्विट आता व्हायरल होत आहे. निमित्त आहे अमेरिकेची निवडणुक... २०१४मध्ये जोफ्रानं 'Joe' असे ट्विट केलं होतं आणि नेटिझन्सनी त्याचा संबंध आताच्या अमेरिकन निवडणुकीशी जोडला.