दुबई : भारतीय युवा महिला फलंदाज जेमिमा रोड्रिग्ज हिने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आयसीसी टी२० क्रिकेट क्रमवारीत मोठी झेप घेत दुसरे स्थान पटकावले. त्याचवेळी, हुकमी फलंदाज स्मृती मानधनानेही चार स्थानांनी प्रगती करत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. भारताला तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत न्यूझीलंडने ३-० ने पराभूत केले आहे. मात्र रॉड्रिग्ज आणि मानधना यांनी प्रत्येक सामन्यात दमदार कामगिरी करत आपले नाणे खणखणीत वाजवले.
जेमिमाने तीन सामन्यांच्या मालिकेत १३२ धावा केल्या, तर मानधनाने १८० धावा फटकावल्या. या कामगिरीच्या जोरावर मानधनाला चार स्थानांचा लाभ झाला. गोलंदाजांमध्ये फिरकीपटू राधा यादवने १८ स्थानांची उडी घेताना १० वे स्थान पटकावले आहे. दीप्ती शर्माने पाच स्थानांची प्रगती केली असून ती १४ व्या स्थानी आहे.
न्यूझीलंडची सोफी डेवाईन ११ व्या स्थानावरून आठव्या स्थानी दाखल झाली आहे. कर्णधार एमी सॅटर्थवेट २३ वरून १७ व्या स्थानी पोहचली आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजची डिएंड्रा डॉटिन अव्वल स्थानी आहे. फलंदाजांमध्ये पाकिस्तानची बिसमाह मारुफने तीन स्थानांची प्रगती करीत १५ वे स्थान गाठले आहे. एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर असलेली सना मीरने सहा स्थानांची उडी घेत २८ वे स्थान पटकावले आहे. संघाच्या क्रमवारीत न्यूझीलंडने इंग्लंडला मागे टाकत दुसरे स्थान गाठले आहे. आॅस्ट्रेलिया अव्वल स्थानी असून भारतीय महिला पाचव्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)