Join us
Daily Top 2Weekly Top 5

जसप्रीत बुमराहने कसोटी खेळण्याची वेळ आली आहे

तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने विजय मिळवला. एकवेळ अशी चिन्हे होती, की पावसामुळे मालिकेतील तिसरा व निर्णायक सामना होणार नाही, पण प्रत्येकी ८ षटकांचा सामना झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 02:45 IST

Open in App

अयाझ मेमन , संपादकीय सल्लागारतीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने विजय मिळवला. एकवेळ अशी चिन्हे होती, की पावसामुळे मालिकेतील तिसरा व निर्णायक सामना होणार नाही, पण प्रत्येकी ८ षटकांचा सामना झाला. इतक्या लहान सामन्याचा खूप कमी आनंद येतो, परंतु उपस्थित प्रेक्षक खूप उत्साही होते. त्यांना सामना पाहायचा होता आणि सामनाही खूप चांगला झाला. ६७ धावांचे संरक्षण करणे सोपे नसते आणि भारताने हे साध्य करतानाच मालिकाही जिंकली. दखल घेण्याची बाब म्हणजे, टी-२० मध्ये न्यूझीलंड अव्वल क्रमांकाचा संघ आहे आणि या संघाविरुद्ध असे यश मिळवणे खूप मोठी गोष्ट आहे. भारतीय संघासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. कारण संघ एका विजयी लयीमध्ये असून मालिकेमागे मालिका विराट सेना काबिज करत आहे. जेव्हापासून विराट कोहली कर्णधार झाला आहे, तेव्हापासून २०१५ साली झालेली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सोडल्यास एकही मालिका भारताने गमावलेली नाही. त्यामुळेच कोहलीचा एक जबरदस्त रेकॉर्ड तयार होत आहे. तसेच, जेवढे तुम्ही यश मिळवता तेवढीच तुमच्यावर जबाबदारीही वाढते. जिंकणे - हरणे एक सवय असते आणि भारतीय संघाला सध्या जिंकण्याची सवय लागली आहे, ती कायम राखणे हेच त्यांच्यापुढे आव्हान आहे.भारताच्या विजयाबद्दल म्हणायचे झाल्यास हा विजय नक्कीच गोलंदाजांनी साकारलेला आहे. अखेरच्या सामन्यातही युजवेंद्र चहल आणि खास करून जसप्रीत बुमराहने ज्याप्रकारे मारा केला तो अप्रतिम होता. बुमराहचा विशेष उल्लेख करावासा वाटतो, की माझ्या मते आता तो मोठ्या स्तरावर म्हणजे कसोटी खेळण्यासही तयार झाला आहे. कारण, सुरुवातीला तो मर्यादित षटकांसाठीच उपयुक्त असलेला गोलंदाज वाटत होता. पण आता तो कसोटी सामन्यातही आपली छाप पाडू शकतो, अशी खात्री वाटू लागली आहे. त्याची एक विचित्र शैली आहे. मात्र असे असले तरीही, त्याचे नियंत्रण जबरदस्त आहे. तसेच त्याच्याकडे विविधताही खूप आहे. कपिलदेवसारखा महान खेळाडूही मत मांडतो की, बुमराहने कसोटी खेळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माझ्या मते महंमद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा यांसारख्या गोलंदाजांसाठी एक सूचना आहे की, त्यांनी संघातील आपआपली जागा सुरक्षित करुन ठेवावी. नाहीतर बुमराह त्यांची जागा नक्कीच घेऊ शकतो.

टॅग्स :जसप्रित बुमराहक्रिकेट