Join us  

Video : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; ३८व्या वर्षी जेम्स अँडरसननं १० षटकांत घेतल्या ७ विकेट्स!

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसननं ( James Anderson) इतिहास रचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 10:46 AM

Open in App

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसननं ( James Anderson) इतिहास रचला. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० विकेट्स घेण्याचा विक्रम रचला. कौंटी चॅम्पियशीप स्पर्धेत लँकशायर क्लबकडून खेळताना ३८ वर्षीय अँडरसननं केंट क्लबविरुद्ध ही ऐतिहासिक कामगिरी केली. २१व्या शतकात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गोलंदाजांमध्ये १००० विकेट्स घेणारा तो पहिलाच खेळाडू बनला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २१६ गोलंदाजांनी १००० विकेट घेतल्या आहेत. 

IPL Format Change: इंडियन प्रीमिअर लीगच्या फॉरमॅटमध्ये मोठे बदल, बीसीसीआयला ८०० कोटींचा फायदा!

अँडरसनच्या गोलंदाजीसमोर केंटच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. त्यानं पहिल्या षटकाच्या अखेरच्या गोलंदाजीवर जॅक क्रॉली ( 0) याला बाद केले. दुसऱ्या षटकात जॉर्डन कॉक्स, तिसऱ्या षटकात ऑली रॉबिन्सन ( ०) यांची विकेट घेतली. त्यानंतर जॅक लेनिंग ( २) याची विकेट घेत अँडरसननं ७ षटकांत ५ निर्धाव षटकं फेकून ३ धावांत पाच विकेट्स घेतल्या.  त्यानंतर मॅट मिल्नस ( १) आणि हॅरी पॉडमोर ( ३) यांना बाद केले. अँडरसननं १० षटकांत पाच निर्धाव षटकं आणि १९ धावांत ७ विकेट्स घेतल्या. त्याची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. केंटचा संपूर्ण संघ ७४ धावांत तंबूत परतला.  

अँडरसननं २००२मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००३मध्ये त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो सातत्यानं खेळत आहे. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये ६१७ विकेट्स घेतल्या आहे आणि कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत तो चौथ्या क्रमांकावर आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत त्यानं तीन विकेट्स घेतल्या तर तो अनिल कुंबळे याचा ६१९ विकेट्सचा विक्रम मोडेल.  

भारत- इंग्लंड मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथे ४ ते ८ ऑगस्ट या कालावधीत खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना लंडनच्या लॉर्ड्‌स मैदानावर १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत होईल. तिसऱ्या सामन्याचे आयोजन २५ ते २९ ऑगस्टदरम्यान लीड्‌सवर होईल तर चौथा सामना २ ते ६ सप्टेंबर या कालावधीत लंडनच्याच ओव्हल मैदानावर खेळविला जाईल.  मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना ६ ते १० सप्टेंबरपर्यंत मॅनचेस्टरमध्ये होईल.

टॅग्स :जेम्स अँडरसनकौंटी चॅम्पियनशिप