-अयाझ मेमन
श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका भारताने सहजपणे ३-० अशी जिंकली. वानखेडे स्टेडियमवर झालेला अखेरचा सामना चांगलाच चुरशीचा झाला. या सामन्याचा अपवाद वगळता मालिका एकतर्फी रंगली. तरी, श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये टी-२० मालिकेदरम्यानही आत्मविश्वास कमी दिसला. खास करून त्यांच्या फलंदाजांमध्ये खूप गोंधळ दिसला. ते स्वत:ला सिद्ध करण्याची घाई करताना दिसले. जेव्हा तुम्ही बलाढ्य संघाविरुद्ध खेळता, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून शिकले पाहिजे आणि त्यांना टक्कर द्यायला पाहिजे. पण दुर्दैवाने श्रीलंकन संघासोबत असे पहायला मिळाले नाही. मी स्वत: श्रीलंकन संघाचा चाहता असल्याने माझ्यासाठी ही निराशाजनक बाब राहिली. लंकेने क्रिकेटविश्वाला जबरदस्त खेळाडू दिले आहेत. दुलीप मेंडिस, रॉय डायस, अरविंद डिसिल्व्हा, अर्जुना रणतुंगा, माहेला जयवर्धने, सनथ जयसूर्या, कुमार संगाकारा, मुथय्या मुरलीधरन अशी अनेक नावे घेता येतील. पण आज श्रीलंका संघाची अवस्था पाहता खूप दु:ख होते. गेल्या दोन वर्षात ज्या काही भारत-श्रीलंका मालिका झाल्या, त्या सर्व एकतर्फी रंगल्या. त्यामुळे श्रीलंकेला यातून खूप शिकावे लागेल.
दुसरीकडे, भारताविषयी म्हणायचे झाल्यास २०१७ वर्ष टीम इंडियासाठी शानदार ठरले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना सोडल्यास भारताने सर्व मालिका जिंकल्या आहेत. खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीबाबत सांगायचे झाल्यास, सर्वप्रथम रोहित शर्माचे नाव घ्यावे लागेल. दुसºया सामन्यात रोहितने शानदार शतक झळकावले. यासह त्याने श्रीलंकेविरुद्ध पूर्ण मालिकेत शानदार खेळी केली. कसोटीमध्ये नाबाद शतक, एकदिवसीय मालिकेत द्विशतक आणि त्यानंतर टी-२०मध्येही त्याने आपला धडाका कायम राखला. त्याने ज्या सहजतेने फटकेबाजी केली, ते पाहता मला वाटते की त्याने ख्रिस गेललाही षटकार ठोकण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. त्याच्याशिवाय लोकेश राहुलने खूप चांगली फलंदाजी केली. पण दुर्दैवाने दक्षिण आफ्रिका दौºयातील एकदिवसीय संघातून त्याला वगळण्यात आले.
डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यानेही लक्ष वेधले. प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करताना त्याने धावगतीवर कमालीचे नियंत्रण राखत बळीही मिळवले. त्यामुळे हा गोलंदाज एकदिवसीय व कसोटी क्रिकेटमध्येही उपयुक्त ठरू शकतो, असे माझे मत आहे. कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल या दोघांनीही अपेक्षित कामगिरी केली. मात्र, तरीही त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी मिळालेली नाही, याचे दु:ख आहे.
थोडक्यात भारताने सातत्यपूर्ण कामगिरी करताना विजयी घोडदौड कायम राखली. महेंद्रसिंग धोनीसारख्या अनुभवी खेळाडूनेही मोलाचे योगदान दिले असल्याने सध्याचा भारतीय संघ अत्यंत मजबूत असल्याचे माझे मत आहे.