Join us  

एखाद्या खेळाडूला विरोध करणे हा मूर्खपणाच! गोव्यातील माजी क्रिकेटपटूंच्या विरोधास मोहम्मद अझरुद्दीनचा जोरदार ‘फटका’ 

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन याचा मुलगा असादुद्दीन याला गोव्याच्या रणजी संघात ‘पाहुणा’ खेळाडू म्हणून घेतल्याने गोव्याच्या किकेट वर्तुळात वादंग निर्माण झाले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 1:09 AM

Open in App

- सचिन कोरडे  

पणजी - भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन याचा मुलगा असादुद्दीन याला गोव्याच्या रणजी संघात ‘पाहुणा’ खेळाडू म्हणून घेतल्याने गोव्याच्या किकेट वर्तुळात वादंग निर्माण झाले होते. काही अनुभवी खेळाडूंनी असादुद्दीनच्या निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आज मोहम्मद अझरुद्दिन यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. अनुभवी खेळाडूंनी एखाद्या खेळाडूला अशा प्रकारे विरोध करणे म्हणजे माझ्या मते मूर्खपणाचीच गोष्ट आहे. बºयाच वर्षांपासून तुम्ही राज्याचे प्रतिनिधित्व करीत असता. तुम्ही योगदान देता. अनुभवी खेळाडू म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. तुम्ही सगळ्या गोष्टी जाणता. तेव्हा एखादा खेळाडू तुमच्या राज्याकडून खेळत असेल तर त्याचा तुम्ही विरोध करता कामा नये, असा टोला अझरुद्दिन यांनी गोव्याच्या अनुभवी रणजीपटूंना मारला. 

येथे झालेल्या एका टेबल टेनिस स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास मोहम्मद अझरुद्दिन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. मोहम्मद अझरुद्दिन हे गोवा क्रिकेटचे मेंटर आहेत. मेंटर बनल्यानंतर त्यांच्या मुलाची रणजी संघात झालेली ‘एण्ट्री’ अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली होती. आजी-माजी रणजीपटूंनी याचा विरोधही केला होता. या संदर्भात अझरुद्दिन पहिल्यांदाच बोलले. ते म्हणाले, मी गोव्याचा मेंटर म्हणून काम करीत आहे. गोव्याच्या रणजी संघात युवा खेळाडू आहेत. बरेच चेहरे नवीन आहेत. या खेळाडूंना विकसित होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. मी या खेळाडूंना तयार करण्याचा प्रयत्न करीन. माझ्यावर ती जबाबदारी आहे. मी गोवा क्रिकेट संघटनेशी जुळल्याचा मला आनंद आहे. मेहनत, जिद्द आणि संयम असेल तर तुम्ही तुमचा खेळ विकसित करू शकता. गोव्याच्या खेळाडूंकडून मला तीच अपेक्षा आहे. 

तुम्ही विशेष रणनीती आखली आहे काय, यावर अझरुद्दिन म्हणाले की, संघ तयार करण्यासाठी मी काही विशेष रणनीती आखलेली नाही. मी खेळाडूंना समजून घेण्याचा तसेच पारखण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणतीही पूर्वनियोजित कल्पना नाही. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हींमध्ये कशी सुधारणा करता येईल याचा प्रयत्न असेल. गोव्यात साधनसुविधा नाहीत याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा इतर ध्येयांकडे लक्ष देण्याची गरज आहे. उपलब्ध सुविधांमध्ये कसे खेळाडू तयार होतील, त्यांच्यासाठी अधिक मेहनत कशी घेता येईल हे महत्त्वाचे आहे. खेळाडू चांगले खेळले तर चांगला संघ तयार होईल. गोवा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी सुद्धा मेहनत घेत आहेत. खास करून, सूरज लोटलीकर यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. ही संघटना नक्की विकसित होईल, असा विश्वास असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. 

अन् सेल्फी, आॅटोग्राफसाठी धूम..

मोहम्मद अझरुद्दिन सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असले तरी त्यांचे चाहते मात्र कमी नाहीत याचा प्रत्यय रविवारी आला. बक्षीस वितरण समारंभ आटोपल्यानंतर तब्बल अर्धा तास मोहम्मद अझरुद्दिनसोबत सेल्फी काढणे आणि आॅटोग्राफ घेणे हा कार्यक्रम सुरूहोता. अझरुद्दिन हे गोव्यातूनच दुबई येथे आशिया चषक स्पर्धेसाठी रवाना होणार होते. त्यांना घाई होती. असे असतानाही त्यांनी चाहत्यांना नाराज केले नाही. उपस्थितांना मोठ्या घाईघाईत त्यांनी फोटो काढू दिले. मोठ्यांबरोबरच चिमुकल्यांच्या चेह-यावरही कमालीचे समाधान दिसत होते. 

कौशल्य विकासासाठी कष्ट करा

प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्य असते. हे कौशल्य हेरून त्याचा विकास करण्यासाठी कष्ट करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असा मंत्र भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन यांनी उपस्थित टेबल टेनिसपटूंना दिला. 

 मी क्रिकेटपटू आहे. मला टेबल टेनिस खेळता येणार नाही. तुम्ही जे करू शकता ते मी करू शकत नाही. प्रत्येकाकडे काहीतरी वेगळे कौशल्य असते. त्याचा विकास करा. लहानपणी मी माझ्या मित्रासोबत सरावासाठी जात होतो. तो टेबल टेनिस खेळायचा आणि मी क्रिकेट. त्याच्यासोबत या खेळाबाबतची चर्चा व्हायची. तेव्हा हा खेळ किती कठीण आहे, याची कल्पना यायची. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही स्वत:ला कुठेतरी दडवून ठेवू शकता; पण या खेळात तसे करता येत नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे बारकावे लक्षात घेत तुम्हाला ध्येय गाठावे लागते. हे एक मोठे कौशल्यच आहे. 

क्रिकेटच्या या देशात टेबल टेनिस हा खेळ मागे राहिल्याचे दु:ख आहे. परंतु, आता एका महिलेने हा खेळ उचांवला असून आगामी काळात उत्कृष्ट खेळाडू मिळतील, असेही अझरुद्दिन यांनी सांगितले.

टॅग्स :गोवाबातम्या