नवी दिल्ली : महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पंचांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याच्या पद्धतीमधून (डीआरएस) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) ‘अम्पायर्स कॉल’ वगळण्याची सूचना करताना शनिवारी सांगितले की, पायचितच्या वेळी जर चेंडू यष्टीवर आदळत असेल तर फलंदाजाला बाद द्यायला हवे.
तेंडुलकरने टिष्ट्वट केले की,‘चेंडूचा किती टक्के भाग यष्टीवर आदळतो, हे महत्त्वाचे नाही. जर डीआरएसमध्ये चेंडू यष्टीवर आदळत असेल तर मैदानावरील पंचाच्या निर्णयाव्यतिरिक्त त्याला बाद द्यायला हवे.’ वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारासोबत व्हिडिओ चॅटदरम्यान तेंडुलकर म्हणाला,‘क्रिकेटमध्ये तंत्राचा वापर करण्याचा हाच उद्देश आहे. तंत्र १०० टक्के अचूक नसते आणि मानवही नाही.’ जर चेंडू केवळ यष्टीला चाटूनही जात असेल तर निर्णय गोलंदाजाच्या बाजूने असायला हवा,असेही सचिन म्हणाला. सचिनने सांगितले की, ‘डीआरएसमध्ये मैदानावरील पंचाचा निर्णय तेव्हाच बदलण्यात येतो जेव्हा चेंडूचा ५० टक्के भाग यष्टीवर आदळत असल्याचे दिसून येते, पण ते योग्य नाही. निर्णयासाठी तिसऱ्या पंचाचा आधार घेण्यात येतो त्यावेळी तांत्रिकतेच्या आधारावर निकाल निश्चित व्हायला पाहिजे.
भारतीय आॅफ स्पिनर हरभजन सिंगने सचिनच्या मताचे समर्थन केले. त्याने टिष्ट्वट केले,‘जर चेंडू यष्टीला चाटून जात असेल तर फलंदाजाला बाद द्यायला हवे. त्यात चेंडूचा किती टक्के भाग यष्टीवर आदळतो, हे महत्त्वाचे नसते. खेळाच्या विकासासाठी काही नियमांमध्ये बदल व्हायला हवे. त्यातील हा एक नियम आहे.’