कोलंबो : गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील खेळपट्टीसोबत छेडछाड करण्याच्या आरोपावर विश्वास ठेवणे कठीण आहे, पण आम्ही आयसीसीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करू, असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.
वृत्तवाहिनी अल जजीराने रविवारी एका वृत्तचित्रामध्ये दाखविले, की मैदानावरील एक कर्मचारी आणि एक खेळाडू गालेमध्ये २०१६ मध्ये आॅस्ट्रेलियाच्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २२९ धावांनी पराभवादरम्यान खेळपट्टीसोबत छेडछाडीची चर्चा करीत होते. आॅस्ट्रेलियाने ही लढत तीन दिवसांमध्ये गमावली होती. गालेच्या मैदानावरील कर्मचारी थरंगा इंडिका आणि व्यावसायिक क्रिकेटपटू थारिंदू मेंडिस इंग्लंडविरुद्ध नोव्हेंबरमध्ये खेळल्या जाणाºया कसोटी सामन्यासाठीही चार दिवसांमध्ये निकाल लागेल, अशा प्रकारची खेळपट्टी तयार करण्याबाबत बोलले. श्रीलंका क्रिकेटने चौकशीचा निकाल येईपर्यंत या दोघांना निलंबित केले आहे. याव्यतिरिक्त विभागीय प्रशिक्षक जीवांता कुलाथुंगा यांनाही निलंबित केले आहे. पण, बोर्डाचे उपाध्यक्ष मोहन डिसिल्व्हा म्हणाले, की कर्णधार, पंच व रेफरी यांनी आॅस्ट्रेलिया व श्रीलंका यांच्यादरम्यान २०१६ च्या सामन्यादरम्यान गालेच्या खेळपट्टीबाबत तक्रार केली नव्हती. (वृत्तसंस्था)