Join us  

इशान किशनचा वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी मोठा निर्णय; कसोटी क्रिकेटचे भवितव्य अंधारमय

रिषभ पंतच्या दुखापतीमुळे कसोटी इशान किशन ( Ishan Kishan) हा भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 11:37 AM

Open in App

भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्यापासून WTC च्या नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी, तीन वन डे आणि ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या दौऱ्यापूर्वी भारताच्या काही युवा खेळाडूंचा सराव व्हावा यासाठी त्यांची निवड दुलिप ट्रॉफी स्पर्धेसाठी केली आहे. रिषभ पंतच्या दुखापतीमुळे कसोटी इशान किशन ( Ishan Kishan) हा भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. पण, इशानने  वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी होणाऱ्या दुलिप ट्रॉफीत खेळण्यास नकार दिला आहे. त्याच्या या निर्णयामुळे कसोटी संघातील त्याचे भवितव्य अंधारमय झाले आहे आणि अशात केएस भरत ( KS Bharat) यालाच संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे.

दुलिप ट्रॉफी स्पर्धेतील पूर्व विभाग संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत इशान किशन आघाडीवर होता. ही स्पर्धा २८ जून ते १६ जुलै या कालावधीत होणार आहे. पण, आता अभिमन्यू इश्वरन नेतृत्व करणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, इशान किशनला पूर्व विभागाचे कर्णधारपद द्यावी अशी विचारणा केली गेली, त्यानुसार विभागीत निवड समिती प्रमुखांना इशानला कॉल केला. पण, त्याने दुलिप ट्रॉफी खेळण्यात इच्छा दाखवली नाही. तो दुखापतग्रस्त आहे की आणखी काही कारण, हे आम्हाला सांगितले गेले नाही. पण, त्याला खेळायचे नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.  

इशानने ४८ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३८.७६ च्या सरासरीने २९८५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ६ शतकं व १६ अर्धशतकं आहेत. इशानच्या नकारानंतर वृद्धीमान साहाला विचारणा केली गेली, परंतु त्यानेही नकार दिला. जर माझी भारतीय संघात निवडच होणार नसेल, तर मी दुलिप ट्रॉफी खेळून युवा खेळाडूची जागा कशाला अडवू, असे उत्तर साहाने दिले. 

टॅग्स :इशान किशनवृद्धिमान साहा
Open in App