नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला २००८ मध्ये सुरू केलेल्या आयपीएलमधून आता २०१७ कोटी रुपये मिळणार आहेत. २००८ मध्ये सुरू करण्यात आलेली ही लीग आता बीसीसीआयच्या मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत बनली आहे. बीसीसीआयला अन्य आंतरराष्ट्रीय सामने आणि देशांतर्गत क्रिकेट सामने करार यातून १२५ कोटी रुपये मिळतील.
वर्षातील ३२० दिवसांमध्ये जेवढे सामने खेळले जातात त्यातून मिळणाºया नफ्याच्या १६ पट जास्त नफा फक्त आयपीएलच्या ४५ दिवसांमधून मिळणार आहे. ३४१३ कोटींच्या उत्पन्नापैकी १२७२ कोटी रुपये क्रिकेट इन्फ्रास्ट्रक्चर आणि अन्य खर्च होतील त्यानंतर दोन हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शिल्लक राहणार आहे.
चालू वर्षात बीसीसीआयच्या एकूण उत्पन्नात आयपीएलचा वाटा ६० टक्के म्हणजे ६७० कोटी रुपये असेल. तर पाच वर्षांच्या प्रसारण हक्कातून बीसीसीआयला १६ हजार ३४७ कोटी रुपये मिळणार आहे. त्यामुळे पूर्ण चित्रच पालटणार आहे. आयपीएलमधून बीसीसीआयला २०१७ कोटी रुपये मिळतील. मागील आर्थिक वर्षात ४०० कोटी रुपये मिळाले होते. (वृत्तसंस्था)