Join us  

आयपीएल आहे इंग्लंडच्या यशाचे रहस्य - जाईल्स

एका कार्यक्रमात जाईल्स म्हणाले, ‘खेळाडूंशी संवाद साधताना मी त्यांना आपल्या वेळापत्रकावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. त्यांना कुठलेही आदेश दिले नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 2:09 AM

Open in App

लंडन : आयपीएल इंग्लंडसाठी लाभदायी ठरले. आमचे खेळाडू या लीगमध्ये खेळत असल्यामुळे राष्ट्रीय संघ मर्यादित षटकांच्या प्रकारात अव्वल स्थानावर विराजमान होऊ शकला, असे मत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापक संचालक ॲश्ले जाईल्स यांनी व्यक्त केले आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी आयपीएलमधून माघार घ्या, असे ईसीबीने कधीही म्हटले नसल्याचे इंग्लंडचा स्टार खेळाडू जोस बटलर याने या आठवड्याच्या सुरुवातीलादेखील सांगितले होते.

एका कार्यक्रमात जाईल्स म्हणाले, ‘खेळाडूंशी संवाद साधताना मी त्यांना आपल्या वेळापत्रकावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. त्यांना कुठलेही आदेश दिले नाहीत. आम्ही कुणावरही दडपण आणत नाही. आयपीएलकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या लीगचा आम्हाला मोठा फायदा झाला. आमचे १२ ते १६ खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. काही वर्षांआधी इंग्लिश खेळाडूंना फारशी मागणी नव्हती. मात्र, आता लोकप्रियता वाढली आहे. याचे कारण अर्थात आमचा संघ वन-डे आणि टी-२० प्रकारात नंबर वन असणे हेच आहे.’यंदा १२ इंग्लिश खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील. यात बटलर, बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर हे राजस्थानकडून, मोईन अली व सॅम कुरेन चेन्नईकडून, डॉम कुरेन दिल्लीकडून, तर डेव्हिड मलान पंजाब किंग्जकडून खेळतील.  इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना २ जूनपासून खेळायचा आहे. याविषयी जाईल्स म्हणाले, ‘आम्ही आयपीएलमध्ये खेळण्यास सर्वांना परवानगी दिली. कसोटी सामन्यांचे वेळापत्रक नंतर तयार करण्यात आले. कोणत्याही खेळाडूला आयपीएल खेळण्यापासून रोखले जाणार नाही.’

टॅग्स :इंग्लंड