मोनाको : ‘मी २०१९ पर्यंत क्रिकेट खेळत राहणार. त्यानंतरच निवृत्तीचा विचार होईल,’ असे अनेक महिन्यांपासून भारतीय संघाबाहेर असलेला अष्टपैलू युवराजसिंग याने म्हटले आहे. युवराजने देशासाठी अखेरचा वन डे जून २०१७ मध्ये खेळला होता. आयपीएलचे आगामी पर्व माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असून, चांगल्या कामगिरीच्या बळावर २०१९ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळू शकते, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
तो पुढे म्हणाला, ‘मी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करू इच्छितो. माझ्यासाठी ही स्पर्धा मोलाची आहे, कारण या बळावर २०१९ पर्यंत खेळण्याची दिशा निश्चित होणार आहे.’
२०११ च्या विश्वविजेतेपदाचा मुख्य आधारस्तंभ राहिलेला युवराज कर्करोगाची झुंज देत मैदानावर परतला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये स्थान निश्चित करू शकलो नाही, याबद्दल खेद वाटतो, असे युवीने सांगितले. (वृत्तसंस्था)
‘करियरमधील सुरुवातीच्या सहा वर्षांत मला अधिक संधी मिळाली नाही. त्यावेळी अनेक दिग्गज कसोटी संघात होते. संधी मिळाली तेव्हा कर्करोगाने ग्रासले. यामुळे सल तर नेहमी राहील, पण काही गोष्टी हातात नसतात,’ असे युवीचे मत आहे.
द.आफ्रिकेत वन डे आणि टी-२० मालिका जिंकणाºया विराट कोहली अॅन्ड कंपनीचे युवीने कौतुक केले. कसोटी मालिका गमविल्यानंतर विराटने पुढे येऊन संघाचे नेतृत्व केले. विदेश दौºयात तीनपैकी दोन मालिका विजय साजरे करणे हे वर्चस्वाचे लक्षण असल्याचे युवीने सांगितले. या विजयाचा लाभ इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळताना होईल, असा आशावाद त्याने
व्यक्त केला.