नवी दिल्ली : बीसीसीआय कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी आयपीएलमधील प्ले आॅफ लढतींचे टायमिंग बदलल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. राजीव शुक्ला यांच्या अध्यक्षतेखालील संचालन परिषदेने सामने रात्री ८ ऐवजी सायंकाळी ७ वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या घडामोडींमुळे प्रशासकांची समिती (सीओए) आणि बीसीसीआयमध्ये बेबनाव असल्याचे उघड झाले.
संचालन परिषदेच्या सदस्यांना विश्वासात घेत हा निर्णय घेतला असल्याचे दिसत नाही, असा आक्षेप चौधरी यांनी नोंदविला होता. त्यावर सीओएप्रमुख विनोद राय यांनी कोषाध्यक्षांना दिलेल्या लेखी उत्तरात शुक्ला यांच्या समितीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. प्ले आॅफमध्ये दररोज एकच सामना होतो व त्यानंतर पुरस्कार सोहळा असल्याने वेळ लागतो, त्यामुळे ७ वाजता सामना सुरू करणे योग्य आहे, असे राय म्हणाले. त्यावर चौधरी यांनी असा निर्णय स्पर्धा
सुरू होण्याआधीच घ्यायला हवा होता. स्पर्धेदरम्यान असा निर्णय घेणे योग्य नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
साबा करीम
यांच्या सूचनेवर सचिवांचा आक्षेप
दरम्यान, १२ जून रोजी बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात एम. के. पतौडी व्याख्यानमालेसाठी कुठल्या वक्त्याला आमंत्रित करायचे, यावर मतभिन्नता आढळून आली. बीसीसीआय सचिव अमिताभ चौधरी यांनी तर क्रिकेट महाव्यवस्थापक साबा करीम यांनी सुचविलेल्या सौरभ गांगुली, नासिर हुसेन आणि केव्हिन पीटरसन या वक्त्यांच्या नावावर तीव्र आक्षेप घेतला. सीओएप्रमुख विनोद राय आणि सदस्य डायना एडल्जी यांनी कुमार संगकाराला आमंत्रित करावे, असे सुचविले. बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना आणि कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांना मात्र करीम यांच्या सूचनेवर कुठलाही आक्षेप नाही. अमिताभ यांनी मात्र साबा करीम यांनी सुचविलेली नावे पसंत नसल्याचा ई-मेल पाठविला.