Join us  

आयपीएल हे मनी लाँड्रिंगचे व्यासपीठ - माजी कर्णधाराचा हल्लाबोल

आयपीएल हे मनी लाँड्रिंगचे व्यासपीठ असल्याची टीका त्यांनी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 1:43 PM

Open in App

कोलकाता : भारतीय संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी  यांनी आयपीएलमध्ये खर्च केल्या जाणाऱ्या रकमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आयपीएल हे मनी लाँड्रिंगचे व्यासपीठ असल्याची टीका त्यांनी केली आहे. कोलकाता साहित्य उत्सवादरम्यान बिशनसिंग बेदी  बोलत होते. "न्यायमूर्ती लोढा आयोग' आणण्यासाठी आयपीएलच जबाबदार आहे. स्वस्त वस्तू एवढी महाग विकताना कधीही पाहिली नाही. मला काही मिळत नसल्यामुळे मी आयपीएलची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप लोक करतात. मात्र तुम्ही मला ठेवू शकता का, याचा प्रयत्न करा," असे आव्हानही बिशनसिंग बेदी  यांनी दिले आहे.

"एक विकेट घेण्यासाठी एक कोटी रुपये आणि एक धाव काढण्यासाठी 97 लाख रुपये हे योग्य आहे का? या पैशांच्या विरोधात मी नाही. मात्र खेळाडूंना एखाद्या क्लबकडून खेळण्यासाठी नव्हे, तर देशाकडून खेळण्यासाठी जास्त पैसे मिळावे," असंही ते म्हणाले. "हा सर्व पैसा कुठून येतो आणि कुठे जातो हे कुणाला माहित आहे का? जर हा मनी लाँड्रिंगचा प्रकार नसेल तर आणखी काय आहे, हे मला माहित नाही," असा गंभीर आरोपही बिशनसिंग बेदी यांनी केला. 

यापूर्वीही बिशनसिंग बेदी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिल्लीतील कार्यक्रमात त्यांनी भारत-पाक मालिकेवर वक्तव्य केलं होतं. पाकविरुद्ध क्रिकेट थांबवून दहशतवाद संपणार आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.  पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय क्रिकेट थांबवून दहशतवाद संपुष्टात येणार आहे का? असा सवाल करीत माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी क्रिकेटच्या राजकारणाआड काहीजण बेगडी देशभक्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात. हे थांबायला हवे, असे आवाहन केले होते.  २०१२ पासून केंद्र शासनाने भारत-पाक क्रिकेट मालिकेला मंजुरी दिलेली नाही. डीडीसीएच्या कार्यक्रमानंतर यावर भाष्य करताना बेदी म्हणाले,‘क्रिकेट परस्परांना जोडण्याचे माध्यम आहे. क्रिकेट थांबविल्याने दहशतवाद थांबणार नाही. पाकिस्तानविरोध म्हणजे देशभक्ती हे समीकरण बनले. हे योग्य नाही. भारत-पाक क्रिकेट सुरू करण्याची मागणी करतो त्यामुळे मी देशभक्त नाही का? मी भारतविरोधी आहे का? देशभक्तीची व्याख्या कृपया संकुचित करू नका.’ असे आव्हान त्यांनी दिल्लीमध्ये केलं होतं. 

टॅग्स :आयपीएल 2018आयपीएलआयपीएल लिलाव