Join us  

आयपीएल सुपरस्प्रेडर नाही, कोरोना महामारीमुळे होतेय टीका

सामन्यांचे स्थळ निश्चित करताना महामारीची स्थिती पाहण्याऐवजी राजकीय हस्तक्षेपानुसार ठिकाण ठरविण्यात आल्याचे दिसून येते. मुंबई आणि दिल्ली हॉटस्पॉट असताना, हे ठिकाण टाळता आले असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 1:34 AM

Open in App

अयाज मेनन

भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे अशा अत्यंत बिकट परिस्थितीतही सुरू असलेली ‘आयपीएल’ योग्य आहे की अयोग्य, असा एक मुद्दा सातत्याने समोर येत आहे. काही लोकांच्या मते या बिकट परिस्थितीतही ‘आयपीएल’द्वारे जास्तीत जास्त आर्थिक फायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे. कोरोनामुळे देशाला ज्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्याकडे दुर्लक्ष करून ही एकप्रकारे उडविलेली थट्टाच आहे. त्याचवेळी, दुसरीकडे असाही मुद्दा मांडला जात आहे की, आयपीएल म्हणजे केवळ ग्लॅमर आणि पैसा नाही; तर यामुळे हजारो हातांना रोजगार मिळत आहेत; शिवाय यामुळे लोकांना काही प्रमाणात मानसिक आरामही मिळत आहे.

सध्याच्या परिस्थितीला सामान्य लोक कशा प्रकारे सामोरे जातात हे पाहतानाच, खेळाडूही कशा प्रकारे सामोरे जात आहेत हेही पाहावे लागेल. रविचंद्रन अश्विन, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झम्पा, लियाम लिव्हिंगस्टोन आणि अँड्र्यू टाय या खेळाडूंनी कोरोनामुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. कुटुंबीयांना होणारा त्रास आणि बायो बबलमध्ये राहून आलेला मानसिक थकवा यांमुळे खेळाडूंनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. इतर खेळाडूंनी दुसऱ्या प्रकारे या समस्येला तोंड दिले. एकीकडे या खेळाडूंनी माघार घेतली असताना, दुसरीकडे ‘केकेआर’कडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने ५० हजार डॉलर्सची आर्थिक मदत पीएम केअर्स फंडामध्ये दिली.

अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मानवी संवेदनशीलता आणि मिळणारा प्रतिसाद सहजपणे उलगडून सांगता येणार नाही. काही खेळाडू व्यावसायिकदृष्ट्या बांधील असल्याने खेळताना दिसतात, तर काहीजण आलेल्या संकटाशी दोन हात करीत सामाजिक भावनेच्या दृष्टीने खेळताना दिसतात. आयपीएलच्या यंदाच्या सत्राबाबत काय केले पाहिजे, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. स्पर्धा रद्द केल्याने कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येणार नाही. सध्याची बिकट परिस्थिती उद्भवली ती दुसऱ्या कारणामुळे, क्रिकेट किंवा लीगमुळे नाही.ही स्पर्धा निवडणूक रॅली किंवा धार्मिक सोहळ्यांप्रमाणे सुपर स्प्रेडर नाही, हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे. सध्याची आयपीएल प्रेक्षकांविना खेळवली जात आहे. 

जर आयपीएल पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार असती, तर कदाचित सद्य:परिस्थिती पाहता ती रद्दही झाली असती; पण आता बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, आयपीएल आयोजन पूर्वनिर्धारित वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहणार. त्याचवेळी, बीसीसीआयकडून सर्व प्रकारची योग्य ती खबरदारीही घेण्यात येत आहे. नक्कीच गंभीरपणे विचार करून आयपीएल आयोजित करण्यात आली असणार, अन्यथा मार्चमध्येही ही स्पर्धा यूएई किंवा अन्यत्र खेळविण्यात आली असती.

सामन्यांचे स्थळ निश्चित करताना महामारीची स्थिती पाहण्याऐवजी राजकीय हस्तक्षेपानुसार ठिकाण ठरविण्यात आल्याचे दिसून येते. मुंबई आणि दिल्ली हॉटस्पॉट असताना, हे ठिकाण टाळता आले असते. ज्या शहराची फ्रेंचाईजीही नाही, त्या अहमदाबादमध्ये प्ले ऑफसह, अंतिम सामना खेळविण्याचे कारण सर्वांनाच माहीत आहे. सामने हैदराबाद व मोहाली येथेही खेळविण्यात येऊ शकत होते.

या दरम्यान एक अशी ओरड करण्यात आली की, खेळाडूंनी विशेष करून भारतीयांनी कोरोनाच्या काळात आर्थिक मदत उभी केली नाही. काहींनी मोठी मदत करताना ही मदत जाहीर केलेली नाही; पण अशा कठीण प्रसंगी केवळ वैयक्तिक आर्थिक मदत पुरेशी ठरणार नाही.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या