Join us  

IPL 2024 PBKS vs DC: पंजाबच्या गोलंदाजांचा दबदबा! पण अखेर दिल्लीचा 'इम्पॅक्ट', शेवटचे षटक गाजवले

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत दिल्ली कॅपिटल्सला १७४ धावांपर्यंत रोखले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 5:21 PM

Open in App

IPL 2024 PBKS vs DC Live Updats In Marathi | मोहाली: नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना शिखर धवनच्या पंजाब किंग्जने चांगली कामगिरी केली. आज पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचा संघ मैदानात उतरला. (IPL 2024 News) पंजाबच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत पाहुण्या दिल्लीला १७४ धावांपर्यंत रोखले. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. (IPL live news) आजच्या सामन्यातून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतचे तब्बल ४५३ दिवसांनंतर पुनरागमन झाले आहे. (IPL live score)

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित २० षटकांत ९ बाद १७४ धावा केल्या. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर (२९), मिचेल मार्श (२०), शाई होप (३३), रिषभ पंत (१८), रिकी भुई (३), ट्रिस्टन स्टब्स (५), अक्षर पटेल (२०) आणि सुमित कुमारने (२) धावा केल्या. पाहुण्या संघाकडून होपने ३३ धावांची खेळी करून यजमानांना आव्हान दिले पण त्यालाही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. मग दिल्लीने अभिषेक पोरेलचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर केला अन् त्याने शेवटचे षटक गाजवले. पंजाबकडून हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी सर्वाधिक २-२ बळी घेतले, तर कगिसो रबाडा, हरप्रीत बरार आणि राहुल चाहर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. पंजाबसमोर विजयाने सुरुवात करण्यासाठी १७५ धावांचे आव्हान आहे. 

शेवटच्या षटकात इम्पॅक्ट दिल्लीकडून अखेरच्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर अभिषेक पोरेलने चमकदार कामगिरी केली. पंजाबकडून शेवटचे षटक हर्षल पटेलने टाकले. अभिषेकने या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. मग षटकार आणि आणखी एक चौकार मारून आपल्या चाहत्यांना जागे केले. चौथ्या चेंडूवर देखील चौकार मारून अभिषेकने आपली छाप सोडली. तसेच पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून त्याने हर्षलला घाम फोडला. अखेरच्या चेंडूवर दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात असताना कुलदीप यादव धावबाद झाला. पण अभिषेकने ३२० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करून दिल्लीची धावसंख्या १७४ पर्यंत पोहोचवली. त्याने अखेरच्या षटकात २५ धावा कुटल्या. १० चेंडूत ३२ धावा करून अभिषेकने सन्मानजनक धावसंख्या उभारली. 

डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या अपघातानंतर पंत क्रिकेटपासून दूर गेला. पण, आज तो फलंदाजी आला तेव्हा चाहत्यांसह सर्व खेळाडूंनी उभे राहून त्याला दाद दिली. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत असलेला आजचा सामना चंदीगड येथील नवीन स्टेडियमवर खेळवला जात आहे. यादविंद्र सिंह क्रिकेट स्टेडियम असे या मैदानाला नाव देण्यात आले आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानात ३६००० प्रेक्षक बसू शकतात. पंजाब किंग्जचा संघ - शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग. 

दिल्ली कॅपिटल्सचा संघ -रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद आणि इशांत शर्मा.

टॅग्स :आयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्सपंजाब किंग्सरिषभ पंतशिखर धवन