मुंबई : आयपीएलच्या अकराव्या सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ७ एप्रिल ते २७ मेदरम्यान या क्रिकेट सर्कसचा थरार रंगेल. विशेष म्हणजे, गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार असल्याने मुंबईकरांसाठी यंदा पर्वणीच असेल.
वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. दखल घेण्याची बाब म्हणजे यंदाच्या सत्रापासून आयपीएल संचालन परिषदेने सामन्यांच्या वेळेत बदल करण्याची विनंतीही मान्य केली आहे. त्यानुसार आता रात्री ८ वाजता सुरू होणारा सामना संध्याकाळी ७ वाजता, तर दुपारी ४ वाजता सुरू होणारा सामना संध्याकाळी ५.३० वाजता खेळविण्यात येईल.
सोमवारी आयपीएलच्या संचालन परिषदेच्या झालेल्या बैठकीत परिषदेचा सदस्य आणि भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली उपस्थित राहू शकला नाही. या वेळी दोन वर्षांनी स्पर्धेत पुनरागमन करीत असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानाबाबतही चर्चा झाली.