मुंबई : आयपीएलच्या आगामी सत्राची ७ एप्रिलपासून सुरुवात होणार असून सलामीला गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होईल. विशेष म्हणजे याआधी सामन्यातील वेळेत बदल करण्याच्या प्रसारणकर्त्यांच्या विनंतीला मान्य करण्यात आल्यानंतर, आता मात्र सर्व सामने जुन्या वेळेनुसारच होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आयपीएलच्या ११ व्या सत्रातील सामने ९ मैदानांवर ५१ दिवस रंगतील. दोन वर्षांच्या बंदीच्या कारवाईनंतर पुनरागमन करत असलेल्या सीएसकेच्या घरच्या मैदानावरील सामने चिंदबरम स्टेडियमवर, तर राजस्थान रॉयल्सचे सामने सवाई मानसिंग स्टेडियमवर होतील.
आयपीएलच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार यंदाच्या सत्रातील १२ सामने दुपारी चार वाजता आणि ४८ सामने रात्री आठ वाजता सुरू होतील. अंतिम सामना २७ मेला मुंबईत होईल.
गेल्या महिन्यात प्रसारणकर्त्यांनी आग्रह केला होता की, दुपारचा सामना सायंकाळी ५.३०पासून, तर रात्रीचा सामना ७ वाजल्यापासून खेळविण्यात यावा. रात्री उशीरा सामना समाप्त होत असल्याने क्रिकेटचाहत्यांना सार्वजनिक वाहतूक मिळण्यास अडचण येत होती आणि खेळाडूही रात्री उशीराने हॉटेलमध्ये पोहचत असल्याने सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा आग्रह करण्यात आला होता.
त्याचवेळी, बीसीसीआयने सामन्यांची वेळ सध्या कायम ठेवली असून काही फ्रेंचाइजी अद्यापही प्रसारणकर्त्यांसह सामन्यांच्या वेळेत बदल करुन घेण्यासाठी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत.