मुंबई : ‘‘आयपीएलने भारतीय क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल घडवले. या स्पर्धेच्या माध्यमातून भारताच्या युवा खेळाडूंची मोठी गुणवत्ता समोर आली. आज क्रिकेट खूप वेगवान झाले असून, आयपीएलमुळे क्रिकेट
खेळाचे चित्र पालटले आहे,’’ अशी प्रतिक्रिया भारताचे माजी यष्टिरक्षक व आक्रमक फलंदाज फारुख इंजिनिअर यांनी दिली.
सोमवारी रात्री मुंबईत आघाडीच्या टायर कंपनीच्या वतीने झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात इंजिनिअर यांना विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘‘आयपीएलमुळे अनेक गुणवान आणि युवा खेळाडूंना संधी मिळाली. आमच्या काळात एका सामन्यासाठी दिवसाला ५० रुपये मानधन
मिळायचे. पण आज ते चित्र पालटले आहे,’’ असे इंजिनिअर या वेळी म्हणाले. इंजिनिअर यांनी या वेळी राशिद खानचे विशेष कौतुक करताना म्हटले, ‘‘माझ्यासाठी सर्वांत लक्षवेधी युवा खेळाडू राशिद खान आहे. अफगाणिस्तानच्या या खेळाडूने स्वत:च्या देशाचे नाव जागतिक नकाशावर उंचावले आहे. तो अफगाणिस्तानची संपत्ती आहे.’’
दरम्यान, या वेळी २०१७-१८ या मोसमात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडलेल्या क्रिकेटपटूंचा गौरव करण्यात आला. गतवर्षी झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या धुवाधार फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधणारी आणि भारतीय संघाला अंतिम फेरीत नेण्यात निर्णायक भूमिका निभावणारी हरमनप्रीत कौर हिला वर्षातील सर्वोत्तम खेळीसाठी सन्मानित करण्यात आले. त्याच वेळी स्टार खेळाडू आणि भारताचा कर्णधार
विराट कोहली याला सलग दुसऱ्यांद, तर एकूण चौथ्यांदा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने गौरविण्यात आले.
क्रिकेट पुरस्कार
सर्वोत्तम टी-२० गोलंदाज : राशिद खान (अफगाणिस्तान)
सर्वोत्तम टी-२० फलंदाज : कॉलिन मुन्रो (न्यूझीलंड)
वर्षातील सर्वोत्तम खेळी : हरमनप्रीत कौर
लोकप्रिय खेळाडू : ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)
वर्षातील सर्वोत्तम देशांतर्गत खेळाडू : मयांक अग्रवाल
१९ वर्षांखालील सर्वोत्तम खेळाडू : शुभमान गिल
वर्षातील सर्वोत्तम गोलंदाज : ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज : शिखर धवन
वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू : विराट कोहली
जीवनगौरव पुरस्कार : फारुख इंजिनिअर