बंगळुरू : आयपीएल लिलावात भारतीय जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकटसाठी राजस्थान रॉयल्सने ११.५० कोटी रुपयांची बोली लावली तर कर्नाटकचा आॅफ स्पिनर कृष्णप्पा गौतम याच्यासाठी ६ कोटी २० लाख रुपये मोजले आहेत. युवा खेळाडूंना लिलावात मोठी रक्कम मिळाली असली तरी दिग्गज गोलंदाज डेल स्टेन याला कोणीही खरेदीदार मिळाला नाही.
बंगळुरू येथे या लिलावाचा आज समारोप झाला. दरवेळी विचारपूर्वक पैसे खर्च करणा-या रॉयल्सने या वेळी आपला खजाना उघडला आणि सर्वात महागड्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. उनाडकट या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याची आधारभूत किंमत १.५ कोटी रुपये होती. चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज इलेव्हन यांच्यातील बोलीमुळे त्याची किंमत वाढली, मात्र अखेरीस राजस्थान रॉयल्सने त्याला खरेदी केले. उनाडकट टी २० मध्ये चांगला खेळाडू मानला जातो त्यामुळे त्याला चांगली पसंती होती. गेल्या सत्रात पुणे सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने १३.४१ च्या सरासरीने २४ गडी बाद केले होते. राजस्थान रॉयल्सने काल झालेल्या लिलावातदेखील बेन स्टोक्सला १२.५० कोटी रुपयात खरेदी केले होते.
अन्य महागड्या खेळाडूंमध्ये गौतमचा समावेश आहे. त्याची आधारभूत किंमत २० लाख रुपये होती. त्याला ६.५० कोटी रुपयात रॉयल्सनेच खरेदी केले. संघांनी आपल्या रणनीतीनुसार जलदगती गोलंदाज आणि फिरकीपटूंची निवड केली आहे.
अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याला आरसीबीने ३ कोटी २० लाख रुपयात विकत घेतले. पंजाबचा जलदगती गोलंदाज संदीप शर्मा ३ कोटी रुपयात सनरायजर्ससोबत जोडला गेला आहे. किंग्ज इलेव्हनने राईट टू मॅचचा वापर करत मोहित शर्माला २.४ कोटी रुपयात कायम ठेवले. झारखंडचा शाहबाज नदीम याला दिल्ली डेअरडेविल्सने ३.२ कोटी रुपयात आपल्या संघात घेतले. तर मोहम्मद सिराजला आरसीबीने २ कोटी ६० लाख रुपयात घेतले. डेल स्टेन, इंग्लंडचा इयोन मॉर्गन, न्यूझीलंडचा कोरी अॅँडरसन या सारख्या खेळाडूंना कोणीही खरेदीदार मिळाला नाही.
नेपाळी क्रिकेटरही आयपीएलमध्ये
- नेपाळचा १७ वर्षीय गोलंदाज संदीप लॅमिच हा आयपीएलच्या लिलावात विकला गेलेला पहिला नेपाळी खेळाडू बनला आहे. दिल्ली डेअरडेविल्सने त्याला २० लाख रुपयांत घेतले. लॅमिच याने २०१६ मध्ये बांगलादेशात झालेल्या १९ वर्षा आतील विश्वचषकात सहा सामन्यात १७च्या सरासरीने १४ गडी बाद केले होते.
- त्यात एका हॅट्रिकचा समावेशदेखील आहे. त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने त्याला एनएसडब्ल्यू प्रीमियर क्रिकेटच्या सत्रात आपल्या संघाकडून खेळण्यासाठी बोलावले होते.
अखेर गेलला
खरेदीदार मिळाला
लिलावातील पहिल्या २ फेºयांत ख्रिस गेलला खरेदी करण्यास एकाही फ्रेंचायझीने उत्सुकता दाखवली नव्हती. मात्र तिसºया फेरीत अखेर किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला बेस प्राईज २ कोटी रुपयात विकत घेतले.
अफगाणी खेळाडूला चार कोटी
राशिद खान पाठोपाठ १६ वर्षांचा अफगाणी फिरकीपटू मुजीब जदरान याला किंग्ज इलेव्हनने ४ कोटी रुपयात आपल्या संघात सामील करून घेतले आहे. अफगाणच्याच राशिद खान याला शनिवारी झालेल्या लिलावात ९ कोटी रुपयात सनरायजर्सने घेतले.
लोक काय बोलतात याची पर्वा नाही : शुक्ला
बंगळुरू : जर लोक आयपीएलबाबत काहीही बोलत असतील तर त्याची कोणतीही पर्वा करत नाही कारण याचे प्रेक्षक आणि महसूल दोन्ही सातत्याने वाढत आहेत, असे आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे. भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी आयपीएलवर टीका केली होती. शुक्ला पुढे म्हणाले की,‘ज्यांना टीका करायची आहे त्यांना ती करू द्या. प्रत्येक वर्षी आयपीएलचे आकर्षण वाढत आहे. दर्शकदेखील वाढत आहेत. आपल्या सर्व माजी खेळाडूंना याचा फायदा होत आहे. सर्वांनी तो घेतला आहे. बेदी यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.’