Join us  

IPL Auction 2018 : हे आहेत सर्वात महागडे दहा भारतीय खेळाडू 

पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही संघमालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रीत न करता भारतीय खेळाडूंना आपल्या संघात सामवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संघमालकांच्या या प्रयत्नात अनेक भारतीय खेळाडूंना चांगल्या रकमेच्या बोली लागलेल्या दिसत आहेत. जाणून घेऊयात सर्वात महागडे भारतीय खेळाडू....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 2:53 PM

Open in App

बंगळुरु -  यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वात जास्त रक्कम मिळाली ती बेन स्टोक्स याला. गेल्या वर्षापेक्षा दोन कोटी कमी मिळाले आहेत. पण यावर्षी संघमालकांनी देशी खेळाडूंवर जुगार खेळत त्यांना मोठ्या रकमेसह खरेदी केलं आहे. आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी जयदेव उनाडकट भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. मनिष पांडे आणि लोकेश राहुल यांना मागे टाकत जयदेव उनाडकट सर्वात जास्त बोली लागलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही संघमालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रीत न करता भारतीय खेळाडूंना आपल्या संघात सामवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संघमालकांच्या या प्रयत्नात अनेक भारतीय खेळाडूंना चांगल्या रकमेच्या बोली लागलेल्या दिसत आहेत. जाणून घेऊयात सर्वात महागडे भारतीय खेळाडू....

 जयदेव उनाडकट - गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये २४ विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा जयदेव उनाडकट हा मध्यमगती गोलंदाज यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सनं तब्बल ११ कोटी ५० लाख रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतलं आहे. गेल्या वर्षी रायझिंग पुणे सुपरजायंट्सने जयदेवला ३० लाख रुपयांमध्ये - अर्थात त्याच्या बेस प्राइसला खरेदी केलं होतं. परंतु, आयपीएल १० मध्ये त्यानं आपली क्षमता सिद्ध केली. रथी-महारथी फलंदाजांना तंबूत धाडण्याची किमया त्यानं करून दाखवली होती. त्याचंच फळ त्याला यंदा मिळालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याला तब्बल १२ कोटी २० लाख रुपये जास्त मिळालेत. सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात जयदेव उनाडकटसाठी जबरदस्त चुरस रंगली होती. पण चेन्नईच्या माघारीनंतर राजस्थान रॉयल्स मैदानात उतरलं आणि त्यांनी बाजी मारली. राजस्थान रॉयल्स हा जयदेव उनाडकटचा आयपीएलमधील पाचवा संघ आहे. याआधी कोलकाता नाइट रायडर्स (२०१०-१२), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (२०१३), दिल्ली डेअरडेविल्स (२०१४-१५), कोलकाता नाइट रायडर्स (२०१६) आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स (२०१७) या संघांकडून तो खेळला आहे.  

लोकेश राहुल - कसोटी क्रिकेटपटूचा ठपका असलेला भारताचा सलामीवीर लोकश राहुलला आयपीएल 2018 लिलावात मोठी किंमत मिळाली आहे. 2 कोटी रुपये बेस प्राईस असलेल्या राहुलचा भाव वाढत जाऊन 11 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने 11 कोटी रुपयांना विकत घेतले.  वनडे, टी-20 पेक्षा कसोटी मालिकेत त्याची कामगिरी उजवी आहे. तरीही आयपीएलमधल्या फ्रेंचायजींनी राहुलवर विश्वास दाखवला आहे. राहुलने 22 कसोटी सामन्यात 1442 धावा केल्या आहेत. त्यात चार शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 10 वनडे सामन्यात राहुलच्या नावावर एक शतक आणि एका अर्धशतक आहे. बारा टी-20 सामन्यात एक शतक आणि तीन अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. गेल्या सत्रात लोकेश राहुलनं आरसीबीचे नेतृत्व केलं होतं. 

मनिष पांडे - गेल्यावर्षी कोलकाता संघाकडून चमकदार कामगिरी करणार्या मनिष पांडेला हैदराबादनं 11 कोटींमध्ये खरेदी केलं आहे. मधल्या फळीत चमकदार कामगिरी कऱण्याची शमता असलेल्या या खेळाडूसाठी मुंबई, पंजाब आणि हैदराबादमध्ये चांगलीच चुरस झाली. पण शेवटी हैदराबादनं त्याला 11 कोटींमध्ये खरेदी केलं. 

कृणाल पांड्या - मुंबई इंडियंसने कृणाल पांड्याला  8.8 कोटींमध्ये खरेदी केलं. कृणालसाठी मुंबईनं इंडियन्सनं राइट टू मॅच कार्डचा वापर केला. गेल्यावर्षी आपल्या अष्टपैलू कामगिरीनं विजयात त्यानं महत्वपुर्ण भूमिका बजावली होती. 

संजू सॅमसन - या यूवा खेळाडूला यावर्षी लॉटरी लागली असेच म्हणावे लागेल. संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सनी 8 कोटींना खरेदी केलं... भारतीय विकेटकिपरला यावर्षी चांगलीच बोली लागली. संजूनं राजस्थानकडून खेळताना निर्णायक पारी खेळत संघाला विजय मिळून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वी तो दिल्लीच्या संघाकडून खेळत होता. 

केदार जाधव - कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचा भरवशाचा खेळाडू महाराष्ट्राचा केदार जाधव या चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात सामील झाला आहे. फलंदाज, ऑफ स्पिनर आणि पर्यायी यष्टिरक्षक या त्याच्या क्षमतेवर सीएसकेने त्याला ७ कोटी ८० लाख रुपयात विकत घेतले आहे. अष्टपैलू कौशल्य असलेल्या केदारची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. चेन्नई सुपर किंग्जने केदारला 7.8 कोटी रुपयांना विकत घेतले. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही जाधवच्या जमेच्या बाजू आहेत. मधल्याफळीत फलंदाजी करणारा केदार जाधव गरज असताना फटकेबाजी करु शकतो आणि प्रसंगी उपयुक्त ऑफस्पिन गोलंदाजी करतो.  केदार जाधव मूळचा पुण्याचा असून टीम इंडियाकडून खेळताना त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. केदार जाधवने 37 एकदिवसीय सामन्यात 797 धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.  नऊ टी-20 सामन्यात केदारच्या 122 धावा असून यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. केदार याआधी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोच्ची टस्कर्स या संघाकडून खेळला आहे.  

रविचंद्रन अश्विन - भारतीय संघातील अनुभवी अश्विनसाठी चेन्नई आणि पंजाबमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. शेवटी पंजाबनं मात करत अश्विनला खरेदी केलं. अश्विनसाठी पंजाबनं 7.6 कोटी रुपयांची बोली लावली. यापूर्वी अश्विने पुणे आणि चेन्नईच्या संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. 

दिनेश कार्तिक - स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत दिर्घकाळानंतर भारतीय संघात परतलेल्या कार्तिकला यावर्षी लॉटरी लागली आहे. विकेटकिपर आणि मधल्या फळीमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या अनुभवी कार्तिकाला 7.4 कोटी रुपयांत कोलकातानं खरेदी  केलं आहे. 

रॉबिन उथप्पा -  मुंबईने 6 कोटी 40 लाखांची बोली लावल्यानंतर कोलकात्यानं रॉबिन उथप्पासाठी 'राइट टू मॅच' कार्डचा वापर करत आपल्याकडेच ठेवलं. गेल्यावर्षी काही वर्षात त्यानं कोलकाताच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली होती. एक आक्रमक सलामिवीर आणि विकेटकिपर असलेल्या उथप्पाला कोलकातानं खरेदी केलं.    

कृष्णप्पा गौतम - कर्नाटकच्या कृष्णप्पा गौतम या ऑफ स्पिनरला खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्सनं बेस प्राइसपेक्षा तब्बल ६ कोटी रुपये जास्त मोजले. २०१७च्या आयपीएल स्पर्धेत कृष्णप्पा गौतम मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. त्यावेळी मुंबईनं त्याच्यावर २ कोटींची बोली लावली होती. परंतु, यावर्षी त्याला आणखी मोठ्ठी लॉटरी लागलीय. कृष्णप्पाचा लिलाव सुरू झाला, तो २० लाखांच्या बेस प्राइसपासून. त्यानंतर, ही रक्कम वाढत वाढत ६ कोटी २० लाखांवर पोहोचली. शेवटची बोली राजस्थानची असल्यानं कृष्णप्पानं 'रॉयल' संघात थाटात प्रवेश केला.  २०१६-१७च्या रणजी मोसमात गौतमनं दिल्ली आणि आसामविरुद्ध पाच-पाच विकेट्स घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक झळकावून आपलं फलंदाजीतील कौशल्यही सिद्ध केलं होतं. त्याच याच कामगिरीची दखल घेऊन राजस्थाननं एवढी किंमत मोजून त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं आहे.  

टॅग्स :आयपीएल 2018आयपीएल लिलावआयपीएल लिलाव 2018आयपीएल