Join us  

IPL Auction 2018 : सोळावं वरीस मोक्याचं... 'हा' १६ वर्षीय अफगाणी क्रिकेटपटू झाला कोट्यधीश

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २१व्या शतकात जन्मलेला पहिला शिलेदार ठरलेला अफगाणिस्तानचा मुजीब जदरान याने आज आयपीएलच्या लिलावात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 1:03 PM

Open in App

बंगळुरु - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २१व्या शतकात जन्मलेला पहिला शिलेदार ठरलेला अफगाणिस्तानचा मुजीब जदरान याने आज आयपीएलच्या लिलावात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या तरुणासाठी सोळावं वरीस मोक्याचं ठरलं असून किंग्ज इलेव्हन पंजाबनं त्याच्यावर ४ कोटी रुपयांची बोली लावलीय.  फिरकी गोलंदाजांच्या लिलावाला सुरुवात होताच, मुजीब जदरानचं नाव पुकारण्यात आलं. त्याची बेस प्राइस होती ५० लाख रुपये. पण त्याच्यावर बोली लागायला सुरुवात झाली आणि तो झटक्यात कोट्यधीश झाला. किंग्ज इलेव्हन पंजाबचे मालक त्याच्यासाठी भलतेच आग्रही दिसत होते. त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही. अखेर, ४ कोटी रुपये देऊन त्यांनी या ऑफ स्पिनरला आपल्या ताफ्यात घेतलं. 

२०१७च्या अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याची किमया मुजीब जदराननं केली होती. पाच सामन्यात त्यानं २० विकेट घेतल्या होत्या आणि संघाला पहिल्यावहिल्या जेतेपदापर्यंत पोहोचवलं होतं. ही कामगिरी पाहूनच, अफगाणिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघात त्याची निवड करण्यात आली. डिसेंबर महिन्यात आयर्लंडविरुद्धच्या वनडेत त्यानं २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली  होती. त्याचा हा कारनामा पाहूनच पंजाबनं त्याच्यासाठी जोरदार बॅटिंग केली आणि बाजीही मारली. 

फिरकीपटूंच्या गटात नॅथन लायन, प्रग्यान ओझा यांच्यावर कुणीच बोली लावली नाही. त्याऐवजी, अपूर्व वानखेडे (कोलकाता - २० लाख), रिंकू सिंह (कोलकाता - ८० लाख), सचिन बेबी (हैदराबाद - २० लाख) या नवोदितांना संघमालकांनी पसंती दिली. 

दरम्यान, आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी जयदेव उनाडकट भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. मनिष पांडे आणि लोकेश राहुल यांना मागे टाकत जयदेन उनाडकट सर्वात जास्त बोली लागलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला राजस्थान रॉयल्स या संघाने तब्बल 11 कोटी 50 लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतलेलं आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवशीही संघमालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रीत न करता भारतीय खेळाडूंना आपल्या संघात सामवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संघमालकांच्या या प्रयत्नात अनेक भारतीय खेळाडूंना चांगल्या रकमेच्या बोली लागलेल्या दिसत आहेत. गौथम कृष्णाप्पा हा खेळाडू 6 कोटी 20 लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. याव्यतिरीक्त वॉशिंग्टन सुंदर, मोहीत शर्मा, संदीप शर्मा, मोहम्मद सिराज या खेळाडूंनाही चांगल्या रकमेच्या बोली लागल्या. त्यामुळे उरलेल्या सत्रात कोणत्या खेळाडूला किती रकमेची बोली लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :आयपीएल 2018आयपीएल लिलावआयपीएल लिलाव 2018आयपीएल