IPL 2025 SRH vs GT 19th Match Player to Watch Mohammed Siraj Gujarat Titans : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात नव्या फ्रँचायझीसह नवी सुरुवात करणारा मोहम्मद सिराज आपल्या गोलंदाजीची धमक दाखवून देताना दिसतोय. आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुच्या ताफ्यातून खेळताना दिसलेला सिराज आता गुजरात टायटन्सचा ताफ्यातील प्रमुख खेळाडू आहे. आयपीएलआधी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या संघातून त्याचा पत्ता कट झाला. हा त्याच्यावर अन्याय होता असा सूरही उमटला. पण जे काही झालं ते त्याच्या भल्याचं ठरताना दिसत आहे. ही गोष्ट आगामी हंगामात सिराजसह त्याच्या फ्रँचायझी संघाला कितपत फायद्याची ठरणार ते बघण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धारदार गोलंदाजी दाखवताना रोहितच्या रुपात केली पहिली शिकार
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मोहम्मद सिराज याने नव्या फ्रँचायझीकडून खेळताना नव्या चेंडूवर गोलंदाजी करताना आपल्यातील धमक दाखवून दिली. पहिल्या सामन्यात पंजाब विरुद्ध ५४ धावा खर्च करताना त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण जबरदस्त कमबॅक करताना त्याने आपल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणाऱ्या रोहित शर्माचीच शिकार केली. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा त्रिफळा उडवत त्याने यंदाच्या हंगामातील पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रायन रिकल्टनलाही त्याने क्लीन बोल्ड केले. जुन्या फ्रँचायझी विरुद्ध बंगळुरुच्या मैदानातही त्याचा जलवा पाहायला मिळाला. या सामन्यात त्याने ३ विकेट्स मिळवल्या. यंदाच्या हंगामात तो फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरणार याची झलकच मागील दोन सामन्यात पाहायला मिळाली.
IPL 2025: 'रिटायर्ड आउट' हा एकप्रकारचा जुगार! T20 मध्ये असं वारंवार घडू शकेल...
"नो ब्रेक.. नो रेस्ट' मोडमध्ये दिसला सिराज
नव्या चेंडूवर सिराज फारसा प्रभावी ठरत नाही, त्यामुळेच त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय वनडे संघात स्थान मिळाले नाही, असे स्पष्टीकरण रोहित शर्मानं दिले होते. त्यामुळेच सिराजनं भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासमोर "फ्लावर नहीं फायर है..." म्हणत आपला तोरा दाखवला, असे चित्र निर्माण झाले. पण "दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं" ही म्हण इथं लागू होते. सिराज हा सातत्याने क्रिकेटच्या मैदानात उतरत आहे. टेस्टमध्ये बुमराहच्या वर्क लोडचा मुद्दा चर्चेत येतो. पण सिराजचा कुणी फारसा विचार करत नाही. कसोटीत बुमराहपेक्षा अधिक चेंडू त्याने टाकले आहेत. २०२२ पासून आतापर्यंत ४३ वनडेत त्याच्या खात्यात ७१ विकेट्स आहेत. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी २०२२ ते २०२३ या कालावधीत प्रत्येकी २२-२२ वनडे सामने खेळताना अनुक्रमे ४७ आणि ४१ विकेट्स घेतल्या आहेत. सिराज सातत्याने कसोटी मालिका, आशिया कप, आयपीएल स्पर्धा खेळताना दिसले. "नो ब्रेक.. नो रेस्ट'मुळे न कळत त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला.
जे होतं ते भल्यासाठीच! ब्रेक मिळाला अन् तो अधिक स्ट्राँग झाला
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवेळी त्याच्याकडे दुर्लक्ष झाले हा मुद्दा आता जुना झालाय. हा विचार करून झालेल्या गोष्टी बदलता येणार नाहीत. पण आयपीएलआधी त्याला जी विश्रांती मिळाली ती त्याच्यासाठी गरजेची आणि फायद्याची ठरतीये हे मात्र नक्की. ब्रेक फायद्याचा ठरला ही गोष्ट खुद्द सिराजनंही बोलून दाखवली आहे. सातत्याने खेळत असताना चुक लक्षात येत असली तरी त्यात करेक्शन करायला वेळ मिळत नव्हता. ब्रेकमध्ये मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या अधिक तंदुरुस्त होण्यासाठी वेळ मिळाला. अशा आशयाचे वक्तव्य त्याने केले आहे.
Web Title: IPL 2025 SRH vs GT 19th Match Lokmat Player to Watch Mohammed Siraj Gujarat Titans
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.