गुजरात टायटन्सविरुद्ध विक्रमी शतक झळकावून राजस्थान रॉयलचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी रातोरात प्रकाशझोतात आला. गुजरातने दिलेल्या २१० धावांचा पाठलाग करताना अवघ्या १४ वर्षाच्या सूर्यवंशीने भल्याभल्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. वैभवने फक्त ३५ चेंडूत शतक झळकावून केवळ राजस्थानच्या विजयाचा पाया रचला नाहीतर, खास विक्रमालाही गवसणी घातली. वैभव सूर्यवंशीच्या या कामगिरीबद्दल बिहार सरकारने त्याचे अभिनंदन केले. तसेच वैभव सूर्यवंशीला बक्षीस म्हणून १० लाख रुपये दिले जातील, अशीही घोषणा केली.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने वेगवान शतक झळकावून सर्वांना आश्चर्यचकीत केले. सूर्यवंशीने आपल्या डावात ११ षटकार आणि सात चौकार मारले. सूर्यवंशीची फलंदाजी पाहून राहुल द्रविड देखील आश्चर्यचकित झाला आणि तो उभे राहून टाळ्या वाजवण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. आता वैभव सूर्यवंशी यांचे अभिनंदन करणाऱ्या लोकांची रांग लागली. क्रिकेटपटूंपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वजण त्याचे अभिनंदन करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचे अभिनंदन केले.
नितीश कुमारकडून वैभव सूर्यवंशी तोंडभरून कौतुक
नितीश कुमार यांनी आपल्या सोशल मिडिया हँडवर लिहिले की, 'आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू (१४ वर्षे) ठरलेल्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीचे अभिनंदन आणि शुभेच्छा. त्याच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेमुळे तो भारतीय क्रिकेटसाठी एक नवीन आशा बनला आहे. सर्वांना त्याचा अभिमान आहे.' पुढे नितीश कुमार म्हणाले की, 'मी २०२४ मध्येच त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मी गेल्या वर्षी वैभव सुर्यवंशीच्या वडिलांना भेटलो आणि त्यावेळी मी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.आयपीएलमधील त्याच्या दमदार कामगिरीनंतर मी त्याच्याशी फोनवर बोललो आणि त्याचे अभिनंदन केले.'
राज्य सरकारकडून मोठे बक्षीस
'बिहारचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी यालाही राज्य सरकारकडून १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. वैभवने भविष्यात भारतीय संघासाठी नवीन विक्रम प्रस्थापित करावेत आणि देशाला गौरव मिळवून द्यावा, माझ्या शुभेच्छा नेहमी त्याच्यासोबत राहतील', असेही नितीश कुमार म्हणाले.
Web Title: IPL 2025 Nitish Kumar announces Rs 10 lakh cash prize for Vaibhav Suryavanshi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.