पंजाब किंग्जविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने खराब गोलंदाजी केल्याबद्दल चाहत्यांनी त्याला ट्रोल केले. पंजाबविरुद्ध पाथिरानाला दोन विकेट्स मिळाल्या. पण त्याने चार षटकांत ४५ धावा दिल्या. त्याच्या महागड्या गोलंदाजीमुळे पंजाबने १९१ धावांचे लक्ष्य सहज गाठले. या पराभवामुळे चेन्नईसाठी प्लेऑफचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत.
चेन्नईच्या पराभवानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. चेन्नईच्या अनेक चाहत्यांनी पाथिरानाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. सध्या मीडियावर 'पाथिरानाला श्रीलंकेत पाठवून द्या' आणि 'पाथिरानाला संघातून काढून टाका', असा ट्रेन्ड सुरू झाला आहे. पाथिराना त्याच्या वेगळ्या गोलंदाजीच्या अॅक्शनसाठी ओळखला जातो, जी लसिथ मिलिंगाशी मिळते. त्याने २०२२ मध्ये चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने २०२३ मध्ये १९ आणि २०२४ मध्ये अवघ्या सहा सामन्यात १३ विकेट्स घेतल्या. परंतु, यंदाच्या हंगामात तो सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसला.
प्रशिक्षकाकडून पाथिरानाचा बचाव
चाहत्यांकडून झालेल्या टीकेनंतर चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्स यांनी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पाथिरानाचा बचाव केला. ते म्हणाले की, 'पाथिरानाने खूप धावा दिल्या आहेत. पण त्याच्या लाईन आणि लेंथमध्ये कोणतीही कमतरता दिसली नाही. याउलट फलंदाज त्याचे चेंडू आधीपेक्षा चांगले खेळत आहेत. फंलंदाजाला आता त्याच्या चेंडूचा चांगला अंदाज आला आहे.'
पंजाबविरुद्ध चेन्नईचा दारूण पराभव
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईचा संघ १९.२ षटकांत १९० ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघाने १९.४ षटकांत हा सामना जिंकला. युजवेंद्र चहलच्या हॅट्ट्रीकनंतर कर्णधार श्रेयस अय्यर (७२ धावा) आणि प्रभसिमरन सिंह (५४ धावा) यांनी महत्त्वपूर्व अर्धशतक झळकावले. या विजयासह पंचाबचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर, या हंगामात १० पैकी आठ सामन्यात पराभूत झालेला चेन्नईचा संघ सलग दुसऱ्यांदा स्पर्धेतून बाहेर झाला आहे.