IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Marathi - गुजरात टायटन्सच्या अफगाणि फिरकीपटूंनी आज कमाल केली. नूर अहमद व राशिद खान यांनी टिच्चून मारा करताना सनरायझर्स हैदराबादच्या धावगतीला वेसण घातले होते. राशिदने आज गुजरात टायटन्सकडून सर्वाधिक विकेट्सचा विक्रम नावावर केला, शिवाय एक भन्नाट कॅचही टिपला.
सनरायझर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड व मयांक अग्रवाल यांनी हैदराबादला चांगली सुरुवात करून दिली, परंतु आजमतुल्लाह ओमारजाई याने गुजरातला पहिले यश मिळवून दिले. मयांक अग्रवाल ( १६) झेलबाद झाल्याने हैदराबादला ३४ धावांवर पहिला धक्का बसला. नूर अहमदने त्याच्या पहिल्याच चेंडूवर हेडचा झेल टाकला, परंतु तिसऱ्या चेंडूवर गुगलीवर त्याने त्रिफळा उडवला. ट्रॅव्हिस हेड १९ धावांवर बाद झाल्याने हैदराबादची अवस्था २ बाद ५८ अशी झाली. मोहित शर्माने त्याच्या पहिल्या षटकात अभिषेक शर्मा ( २९) ला बाद करून SRH ला तिसरा धक्का दिला.
हेनरिच क्लासेन व एडन मार्करम ही फॉर्मात असलेली जोडी मैदानावर उभी राहिली आणि क्लासेनने गुजरातच्या अहमदचा नूर बदलला व दोन खणखणीत षटकार खेचले. पण, राशिद खानने गुगलीवर क्लासेनचा ( २४) त्रिफळा उडवून गुजरातला मोठी विकेट मिळवून दिली. या विकेटनंतर प्रशिक्षक आशिष नेहरा सेलिब्रेशन करताना दिसला. गुजरात टायटन्सकडून तो सर्वाधिक ४९ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आणि त्याने मोहम्मद शमीला ( ४८) मागे टाकले. पुढच्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर राशिदने अप्रतिम झेल टिपला आणि मार्करम १७ धावांवर बाद झाला.
सनरायझर्स हैदराबादचा निम्मा संघ ११४ धावांवर तंबूत परतला.