Join us  

RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा

शेवटच्या षटकांत रजत पाटीदार व कॅमेरून ग्रीन यांनी दमदार फटकेबाजी करून संघाला दोनशेपार पोहोचवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 9:53 PM

Open in App

IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चांगल्या सुरुवातीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या फिरकीपटूंनी मधल्या षटकांत जखडून ठेवले होते. मिचेल सँटनर व महिशा तीक्षणा यांनी चांगला मारा केला आणि RCB च्या धावांची गती कमी केली. पण, शेवटच्या षटकांत रजत पाटीदार व कॅमेरून ग्रीन यांनी दमदार फटकेबाजी करून संघाला दोनशेपार पोहोचवले. RCB ला प्ले ऑफचे तिकीट पक्कं करण्यासाठी CSK ला २०० धावांवर रोखावे लागेल. 

OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी RCB ला आक्रमक सुरुवात करून देताना ९.४ षटकांत ७८ धावा जोडल्या. CSK च्या फिरकीपटूंनी या दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवले होते आणि त्यामुळे त्यांनी मोठे फटके मारणे योग्य समजले. त्या प्रयत्नात असलेल्या विराटची विकेट मिचेल सँटनरने मिळवली. तो २९ चेंडूंत ४७ धावा करून परतला. १३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फॅफ दुर्दैवी रन आऊट झाला. सँटनरचा चेंडू रजत पाटीदारने सरळ खेचला अन् नॉन स्ट्रायकर एंडवर फॅफ पुढे गेला होता. चेंडू सँटनरच्या बोटाला लागून यष्टींवर आदळला. बेल्स उडाल्यानंतर फॅफची बॅट क्रिजमध्ये परतली आणि त्यामुळे तिसऱ्या अम्पायरने फॅफला बाद ठरवले. फॅफ ३९ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर रन आऊट झाला. RCB ला ११३ धावांवर दुसरा धक्का बसला.   मिचेल सँटनरने त्याच्या चार षटकांत ( १-२३) या दोन्ही विकेट मिळवून दिल्या, महिशा तीक्षणानेही त्याच्या ४ षटकांत फक्त २५ धावा दिल्या. पाटीदार व कॅमेरून ग्रीन यांनी चांगली फटकेबाजी केली. ग्रीनचा एक सोपा झेल डॅरिल मिचेलने टाकला. RCB च्या या जोडीने २२ चेंडूंत पन्नास धावांची भागीदारी पूर्ण केली. पाटीदार २३ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावांवर झेलबाद झाला आणि ग्रीनसोबतची त्याची २८ चेंडूंतील ७१ धावांची भागीदारी तुटली. डॅरिल मिचेलने पुन्हा एकदा सीमारेषेवर सुरेख झेल घेतला. दिनेश कार्तिकने ( १४ धावा, ६ चेंडू) त्यानंतर दमदार फटके खेचले. तुषार देशपांडेने ४ षटकांत ४९ धावा देत १ विकेट घेतली. 

ग्लेन मॅक्सवेल ५ चेंडूंत १६ धावा चोपून गेला. कॅमेरून ग्रीन १७ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला आणि बंगळुरूने ५ बाद २१८ धावा केल्या. बंगळुरूला हा सामना १८ धावांनी जिंकावा लागेल, तर ते नेट रन रेटच्या जोरावर चेन्नईला मागे टाकून प्ले ऑफमध्ये जातील. 

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्सविराट कोहलीएफ ड्यु प्लेसीस