Join us  

'पंजाब किंग्ज'चा आशुतोष शर्मा नक्की कोण... शेवटच्या षटकांत SRHच्या गोलंदाजांना फोडला घाम

IPL 2024 PBKS vs SRH Ashutosh Sharma: आशुतोष शर्माने १५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३३ धावा कुटल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:11 AM

Open in App

Ashutosh Sharma Punjab Kings, IPL 2024 PBKS vs SRH: सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेला सामना कमालीचा रंगतदार झाला. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या SRH ने ९ बाद १८२ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ अवघ्या २ धावांनी कमी पडला. सुरुवातीपासूनच लक्ष्याचा धाडसीपणे पाठलाग करणाऱ्या पंजाबच्या संघाला काल एक नवा 'हिरो' मिळाला. पंजाबच्या संघाने जरी सामना हरला असला तरी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देणाऱ्या आशुतोष शर्माचे मात्र सर्वत्र कौतुक केले जात आहे. शेवटच्या षटकात २९ धावांची गरज असताना पंजाबच्या शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा या दोघांनी २७ धावा केल्या. शशांक सिंह यांनी याआधीही स्पर्धेत आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे. पण आशुतोष शर्माने काल १५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३३ धावा करून आपली चमक दाखवून दिली. जाणून घेऊया त्याच्याबद्दल...

पंजाब किंग्जचा आशुतोष शर्मा कोण आहे?

आशुतोष हा मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो सध्या रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. IPL 2024 च्या लिलावात त्याला पंजाब किंग्जने २० लाख रुपयांना विकत घेतले. तो स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा तो भारतीय खेळाडू आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या गेल्या मोसमात आशुतोषने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ११ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आशुतोषने २००७च्या T20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या युवराज सिंगचा विक्रम मोडला होता.

गुजरातविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या विजयात शशांकसोबतच आशुतोष शर्माने चांगली खेळी केली होती. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध तर त्याने साऱ्यांचेच लक्ष वेधले. SRH विरूद्ध दमदार खेळी करणाऱ्या आशुतोषने गुजरातविरुद्ध IPLमध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात 'इम्पॅक्ट प्लेयर' आशुतोषने १७ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा केल्या होत्या. आशुतोष आणि शशांक यांच्यात सातव्या विकेटसाठी २२ चेंडूत ४३ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे गुजरातला पंजाबने नमवले होते.

टॅग्स :आयपीएल २०२४पंजाब किंग्ससनरायझर्स हैदराबाद