Join us  

IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम

आज आयपीएलचा फायनलचा सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 1:37 PM

Open in App

IPL 2024 Final Prize Money : आयपीएल २०२४ चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. चेन्नईत होत असलेल्या या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या संघावर पैशांचा पाऊस होईलच... याशिवाय उपविजेत्या संघाला देखील चांगली रक्कम मिळणार आहे. पर्पल आणि ऑरेंज कॅप विजेत्या खेळाडूंना लाखो रूपयांचे बक्षीस दिले जाईल. (IPL 2024 News) 

आयपीएल विजेत्या संघाला बक्षीस म्हणून २० कोटी रूपये दिले जातात. या बक्षिसाचा मानकरी कोणता संघ होतो हे रविवारी रात्री समोर येईल. अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या अर्थात उपविजेत्या संघाला १३ कोटी रूपयांचे बक्षीस दिले जाईल. तिसऱ्या स्थानावरील संघाला ७ कोटी आणि चौथ्या स्थानावर असलेला संघ ६.५ कोटी रूपये जिंकेल. ऑरेंज कॅप विजेत्या खेळाडूला १५ लाख रूपये मिळतील. विराट कोहली या शर्यतीत आघाडीवर आहे. स्पर्धेतील इमर्जिंग प्लेअरला २० लाख आणि मोस्ट व्हॅल्युएबल ठरणाऱ्या शिलेदाराला १२ लाख रूपयांचे बक्षीस दिले जाईल.

दरम्यान, यंदा अंतिम फेरी गाठणारा केकेआर हा पहिला संघ ठरला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरच्या संघाने चमकदार कामगिरी करत अव्वल स्थान गाठले. तर हैदराबादच्या संघाने स्फोटक खेळीच्या जोरावर ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात निर्धारित २० षटकांत तब्बल २८७ धावा करून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. या आधी त्यांनी मुंबई इंडियन्सविरूद्ध २७७ धावा करण्याची किमया साधली.

दरम्यान, मागील वर्षी अर्थात आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यात पावसाने बॅटिंग केली होती. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना रात्री उशीरापर्यंत चालला. अखेर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने बाजी मारून सहाव्यांदा आयपीएल जिंकण्याची किमया साधली. गुजरातला सलग दुसऱ्यांदा किताब जिंकण्यात अपयश आले.   

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबाद