Join us  

दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातला आयपीएल २०२४ मधील सामना चुरशीचा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:13 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Gujarat Titans Marathi Live: दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातला आयपीएल २०२४ मधील सामना चुरशीचा झाला. DC च्या २२४ धावांच्या प्रत्युत्तरात GT कडून चांगला संघर्ष पाहायला मिळाला. रसिख सलाम व कुलदीप यादव यांनी दोन विकेट्स घेऊन दिल्लीला आशेचा किरण दाखवला होता. पण, डेव्हिड मिलरने 'Killer' फटकेबाजी करून दिल्लीच्या पोटात गोळा आणला. रसिखने अफलातून झेल घेत मिलरचा अडथळा दूर केला अन् दिल्लीच्या जीवात जीव आला. पण, राशिद खानने शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेली. मात्र, त्रित्सान स्तब्सने दिल्लीसाठी वाचवलेल्या पाच धावा निर्णायक ठरला आणि त्यांनी गुजरातला ४ धावांनी हार मानावी लागली. दिल्लीच्या विजयात रिषभ पंत व अक्षर पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

पृथ्वी शॉ ( ११), जॅक फ्रेझर-मॅकगर्क ( २३) व शे होप ( ५ ) यांना संदीप वॉरियरने माघारी पाठवले. पण, रिषभ पंत व अक्षर पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी ६८ चेंडूंत ११३ धावा जोडल्या.  अक्षरने ४३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावा केल्या. त्रिस्तान स्तब्सने७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २६ धावांवर नाबाद राहिला. रिषभने २०व्या षटकात २,१w,६,४,६,६,६ अशी तुफान फटकेबाजी केली. दिल्लीने शेवटच्या १० चेंडूंत ५० धावा जोडल्या आणि ४ बाद २२४ धावा उभ्या केल्या.  रिषभने ४३ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८८ धावांची खेळी केली. गुजरातचा गोलंदाज मोहित शर्मा ( ७७ धावा) आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला.

आयपीएल इनिंग्जमध्ये एका गोलंदाजाविरुद्ध ५० हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रिषभने अव्वल स्थान पटकावले. त्याने मोहित शर्माच्या १८ चेंडूंत ६२ धावा चोपल्या. यापूर्वी विराट कोहलीने २०१३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या उमेश यादवच्या १७ चेंडूंत ५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, गुजरातची सुरुवात काही खास झाली नाही आणि शुबमन गिल ( ६) दुसऱ्याच षटकात एनरिच नॉर्खियाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. Impact Player साई सुदर्शनचा २० धावांवर अक्षरने सोपा झेल टाकला. साई आणि वृद्धीमान साहा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून GT ला फ्रंटसीटवर बसवले. १०व्या षटकात कुलदीप यादवने ही जोडी तोडली. सहाचा ३९ धावांवर अक्षरने अफलातून झेल घेतला. पण, साईने २९ चेंडूंत अर्धशतक झळकावून गुजरातला सामन्यात जीवंत ठेवले. अक्षरने त्याच्या षटकात GT च्या अझमतुल्लाह ओमारजाईला ( १) बाद केले. रसिख सलामने त्याची पहिली विकेट घेताना गुजरातला मोठा धक्का दिला. साई ३९ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६५ धावांवर झेलबाद झाला. रसिखने त्याच्या पुढच्या षटकात शाहरुख खानला ( ८) माघारी पाठवून दिल्लीला मोठे यश मिळवून दिले. गुजरातला ३० चेंडूंत ७८ धावा करायच्या होत्या. कुलदीपने फिरकीच्या जाळ्यात राहुल तेवातियाला ( ४) ओढून गुजरातला सहावा धक्का दिला. २४ चेंडू ७३ धावा असा सामना चुरशीचा झालेला आणि डेव्हिड मिलर उभा होता अन् त्याने १७व्या षटकात ४,६,०,६,६,२ असे फटके खेचून २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.  १८व्या षटकात पहिल्या चेंडूवर राशिद खानचा सोपा झेल टाकला गेला अन् स्ट्राईकवर आलेल्या मिरलने पुढील चेंडू चौकार खेचला. पण, तिसऱ्या चेंडूवर मिलरची विकेट मिळाली आणि रसिखने ही कॅच घेतली. मिलर २३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांवर माघारी परतला. GT ला १२ चेंडूंत ३७ धावा करायच्या होत्या. त्रित्सान स्तब्सने १९व्या षटकात हवेत झेपावत गुजरातच्या ६ धावा अडवल्या, त्याने दिल्लीच्या ५ धावा वाचवल्या.

साई किशोरने सलग दोन षटकार खेचून व्याजासह वसूली केली. रसिखने शेवटच्या चेंडूवर साईचा ( १३) त्रिफळा उडवला. ६ चेंडू १९ धावा असा सामना अजूनही थरारक होता आणि राशिद स्ट्राईकवर होता. मुकेशच्या पहिल्या २ चेंडूवर राशिदने चौकार खेचले. तिसरा व चौथा चेंडू डॉट गेला, कारण राशिदने धाव घेण्यास नकार दिला. पाचव्या चेंडूवर ६ मारून राशिदने १ चेंडू ५ धावा असा सामना आणला. पण, गुजरातला ८ बाद २२० धावाच करता आल्या आणि दिल्लीने ४ धावांनी सामना जिंकला. राशिद ११ चेंडूंत २१ धावांवर नाबाद राहिला. 

टॅग्स :आयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्सलखनौ सुपर जायंट्स