Join us  

IPL 2024, CSK Vs GT: रवींद्र-ऋतुराजने झोडले, मग दुबेने बडवले, चेन्नईने गुजरातसमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले

IPL 2024, CSK Vs GT: सलामीवीर रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीत शिवम दुबे याने केलेल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने गुजरात टायटन्सविरुद्ध धावांचा डोंगर उभा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 9:24 PM

Open in App

सलामीवीर रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीत शिवम दुबे याने केलेल्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने गुजरात टायटन्सविरुद्ध धावांचा डोंगर उभा केला. चेन्नई सुपरकिंग्सने २० षटकांत ६ बाद २०६ धावा फटकावल्या आणि गुजरातसमोर विजयासाठी २०७  धावांचे आव्हान ठेवले. चेन्नईकडून रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी प्रत्येकी ४६  धावा काढल्या तर शिवम दुबेने २३ चेंडूत ५१ धावांची वादळी खेळी केली.

नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यावर ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र या चेन्नईच्या सलामीवीरांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. या दोघांनी केलेल्या फटकेबाजीमुळे अवघ्या २७ चेंडूतच चेन्नईचं अर्धशतक फलकावर लागलं. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाडपेक्षा रचिन रवींद्र अधिक आक्रमक खेळत होता. तो झटपट आपलं अर्धशतक पूर्ण करणार असं वाटत असतानाच रशीद खानच्या फिरकीवर वृद्धिमान साहाने चपळ क्षेत्ररक्षण करत त्याची खेळी संपुष्टात आणली. रवींद्रने २० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४६ धावा कुटल्या.

रवींद्र बाद झाल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने अजिंक्य रहाणेच्या साथीना मोर्चा सांभाळला.  ऋतुराज गायकवाडने आक्रमक फलंदाजी करत चेन्नईला अवघ्या ९.५ षटकांमध्येच शंभरीपार मजल मारून दिली. पण ही जोडी स्थिरावत असतानाच साहाने पुन्हा एकदा चपळता दाखवत अजिंक्य रहाणेला (१२) साई किशोरच्या गोलंदाजीवर यष्टीचित केले. त्यानंतर एक बाजू लावून धरणारा ऋतुराज गायकवाडही ४६ धावा काढन स्पेंसरच्या गोलंदाजीवर बाद झाला. 

डावाची चांगली पायाभरणी झालेली असल्याने पुढच्या षटकांमध्ये शिवम दुबे आणि डेरेल मिचेल यांनी फटकेबाजी सुरूच ठेवली. १५ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर या दोघांनीही संघाचं दीडशतक फलकावर लावलं. तुफानी फलंदाजी करणाऱ्या दुबेने ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २२ चेंडूत ५१ धावा कुटल्या. त्यानंतर समीर रिझवी (१४), डेरेल मिचेल  २४) आणि रवींद्र जडेजा (७)  यांनी केलेल्या समयोचित फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने २० षटकांत ६ बाद २०६ धावांपर्यंत मजल मारली. गुजरातकडून रशिद खान याने दोन तर मोहित शर्मा, साई किशोर आणि स्पेंसर यांना प्रत्येकी १ बळी टिपला. 

टॅग्स :आयपीएल २०२४चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स