Join us  

IPL 2023 Mini Auction: "... म्हणून मयंक अग्रवाल दुखावला आहे", ख्रिस गेलचा पंजाब किंग्जच्या फ्रँचायझीवर गंभीर आरोप 

आयपीएल 2023 चा मिनी लिलाव आज कोची येथे पार पडत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 12:19 PM

Open in App

कोची : आयपीएल 2023 चा मिनी लिलाव आज कोची येथे पार पडत आहे. त्यापूर्वी वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज आणि आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक ख्रिस गेलने एक मोठे वक्तव्य केले आहे. त्याने पंजाब किंग्जच्या संघावर नाराजी व्यक्त करताना मयंक अग्रवालचे कौतुक केले आहे. खरं तर पंजाबच्या संघाने मयंक अग्रवालची कर्णधारपदावरून हकालपट्टी केली हा निर्णय हास्यास्पद असल्याचे गेलने म्हटले. ख्रिस गेल पंजाब किंग्जच्या संघाचा हिस्सा राहिला आहे, मात्र आयपीएल लिलावापूर्वी पंजाब किंग्जने त्याला रिलीज केले होते.  

संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मयंक अग्रवालने मागील हंगामातील 13 सामन्यांत 196 धावा केल्या आहेत. तसेच पंजाबच्या संघाला संपूर्ण हंगामात काही उल्लेखणीय कामगिरी करता आली नाही आणि संघ सहाव्या स्थानावर फेकला गेला. लक्षणीय बाब म्हणजे 2014 मध्ये पहिल्यांदाच पंजाबच्या संघाने आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. त्यांच्या संघाला अद्याप एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आले नाही. 

गेलचा पंजाबच्या फ्रँचायझीवर आरोप वृत्तसंस्था पीटीआयशी संवाद साधताना गेलने म्हटले, "पंजाबच्या फ्रँचायझीने मयंक अग्रवालला योग्य वागणूक दिली नाही, त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या लिलावात त्याला मोठी रक्कम मिळेल अशी अपेक्षा आहे. मयंकला नक्कीच निवडले जाईल. जर तसे झाले नाही तर मी खूप निराश होईल. कारण तो तसा स्फोटक खेळाडू आहे. त्याने पंजाबच्या फ्रँचायझीसाठी शानदार खेळी करूनही पंजाबने त्याला कायम न ठेवल्याने तो कदाचित दुखावला गेला आहे. त्याला अशी वागणूक देणे चुकीचे ठरेल परंतु मला आशा आहे की इतर संघ अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि त्याला चांगले पैसे देतील", असे त्याने आयपीएल लिलावापूर्वी जिओ सिनेमाने आयोजित केलेल्या संवादात सांगितले. 

IPL खेळाडूंच्या लिलावासाठी ख्रिस गेल JioCinema च्या एक्सपर्ट पॅनेलचा एक भाग आहे. 43 वर्षीय गेल आयपीएलच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात कोलकाता नाईट रायडर्स या फ्रँचायझीतून केली. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने गेलला एक वेगळी ओळख दिली. आरसीबीतूनच खेळताना गेलने पुणे वॉरियर्सविरूद्ध 175 धावांची स्फोटक खेळी केली होती. याशिवाय गेल पंजाब किंग्जच्या संघातूनही खेळला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२ख्रिस गेलपंजाब किंग्समयांक अग्रवाल
Open in App