Join us

IPL 2023: क्रिकेटमधील मराठी शब्दांची ओळख! बोरीवलीचा सिद्धेश लाड करतोय मराठी समालोचन

समालोचनाद्वारे मराठी भाषेतून क्रिकेटचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 12:34 IST

Open in App

रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘समालोचनाद्वारे मराठी भाषेतून क्रिकेटचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान होते आणि त्यात मी थोडाफार यशस्वी ठरलोय. हा खूप चांगला अनुभव असून यानिमित्ताने क्रिकेटमधील मराठी शब्दांची ओळख झाली. याआधी कधीही समालोचन केले नसताना थेट आपल्या भाषेतून समालोचन करण्याचा आनंद घेतोय,’ अशी प्रतिक्रिया देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार फलंदाज सिद्धेश लाड याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा संकटमोचक म्हणून ओळखला जाणारा बोरीवलीचा सिद्धेश गेल्या सत्रापासून गोवा संघाचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएल सामन्यांदरम्यान सिद्धेश एका ओटीटी ॲपवर मराठी समालोचन करत आहे. क्रिकेटचाहत्यांचाही मराठीतील समालोचनास मोठा प्रतिसाद लाभत आहे.

सिद्धेशने सांगितले की, ‘हा अनुभव खूप चांगला आहे. पहिल्यांदाच हे काम करत असल्याने हे नव्या प्रकारचे आव्हानही आहे.  आपण मुंबईत संमिश्र भाषा वापरतो. कधी मराठी, कधी हिंदी, तर कधी इंग्रजी, त्यामुळे परिपूर्ण मराठी आपण सहजासहजी बोलत नाही. त्यामुळे क्रिकेटचा खेळ शुद्ध मराठीमध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे मोठे आव्हान होते आणि त्यात मी थोडाफार यशस्वी झालोय. जशी ही स्पर्धा पुढे सरकेल, तसा माझाही येथे जम बसेल.’

 तयारीविषयी सिद्धेश म्हणाला की, ‘याआधी मी घरी गंमत म्हणून समालोचन केले होते, पण आयपीएलदरम्यान कोणतीही चूक चालणार नव्हती.  माझा मित्र अमित थवाळ याची मदत झाली.’ 

टॅग्स :आयपीएल २०२३ऑफ द फिल्डबोरिवली
Open in App