Join us  

Shivam Mavi IPL 2022 LSG vs KKR Live Updates : 6,6,6,W,6,6; १९व्या षटकाने चित्रच बदलले, लखनौ सुपर जायंट्सने KKRसमोर तगडे आव्हान उभे केले 

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Updates : लखनौ सुपर जायंट्सला पहिल्याच षटकात कर्णधार लोकेश राहुलची विकेट गेल्याने धक्का बसला, परंतु कोलकाता नाई रायडर्सना त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 9:16 PM

Open in App

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Updates : लखनौ सुपर जायंट्सला पहिल्याच षटकात कर्णधार लोकेश राहुलची विकेट गेल्याने धक्का बसला, परंतु कोलकाता नाई रायडर्सना त्यांनी सडेतोड उत्तर दिले. क्विंटन डी कॉकचे अर्धशतक व दीपक हुडा यांनी LSGचा मजबूत पाया उभा केला. त्यावर कृणाल पांड्या, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी यांनी धावांचा डोंगर उभा केला. शिवम मावीने टाकलेल्या १९व्या षटकात LSGने ५ षटकार खेचून ३० धावा कुटल्या. 

पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर क्विंटन डी कॉकने फटका मारला. क्विंटन व लोकेश दोघंही रन घेण्यासाठी पळाले, परंतु क्विंटनने माघारी जाण्याचा इशारा केला. तोपर्यंत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने बुलेट थ्रो केला व लोकेशला रन आऊट होऊन माघारी जावे लागले. पण, क्विंटन व दीपक हुडा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. लोकेशच्या विकेटनंतर क्विंटनने जबाबदारीने खेळ करताना २९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५० धावा केल्या. सुनील नरीनने ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर दीपकने फटकेबाजी सुरू ठेवली.

आंद्रे रसेलने KKRला हवी असलेली विकेट मिळवून दिली. दीपक २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ४१ धावांवर अय्यरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. कृणाल पांड्या व आयुष बदोनी यांच्यावर आता लखनौची मदार होती, परंतु KKRची गोलंदाजी उत्तरोत्तर बहरताना दिसली. रसेलने LSG ला आणखी एक धक्का देताना कृणालला २५ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. बदोनी खेळपट्टीवर चिकटून बसला.. मार्कस स्टॉयनिस फटकेबाजी करणार याची खात्री त्याला होती आणि तसे घडलेही. स्टॉयनिसने १९व्या षटकात शिवम मावीला सलग तीन षटकार खेचून KKRचा आत्मविश्वासाच्या चिंधड्या उडवल्या. मावीने चौथ्या चेंडूवर स्टॉयनिसला बाद केले, परंतु LSG ला त्याने चांगली धावसंख्या उभारून दिली होती. 

स्टॉयनिस १४ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जेसन होल्डरने अखेरच्या दोन चेंडूवर षटकार खेचले. मावीच्या त्या षटकात ३० धावा चोपल्या. ( 6,6,6,W,6,6. 30 runs and 5 sixes from the Shivam Mavi over.) होल्डर  ४ चेंडूंत १३ धावा करून माघारी परतला. टीम साऊदीने २०व्या षटकात चांगली गोलंदाजी केली. लखनौला ४ धावाच दिल्या. लखनौने ७ बाद १७६ धावा केल्या. बदोनी १५ धावांवर नाबाद राहिला. 

नाणेफेकीचा कौल?कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, प्रमुख गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याशिवाय KKRला मैदानावर उतरावे लागले. उमेशच्या जागी हर्षित राणाला संधी मिळाली आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत काठावर बसलेल्या लखनौला आता प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. कोलकाताही समान बाकावर आहे, परंतु त्यांच्या प्ले ऑफच्या आशा अंधुक आहेत.   

टॅग्स :आयपीएल २०२२लखनौ सुपर जायंट्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App