Join us  

Rinku Singh IPL 2022 LSG vs KKR Live Update : थरारक लढतीत लखनौ सुपर जायंट्सचा विजय; कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान संपुष्टात 

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update : क्विंटन डी कॉक ( Quinton De Kock ) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) यांच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर मोहसिन खानने ( Mohsin Khan) कमाल केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:23 PM

Open in App

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update : क्विंटन डी कॉक ( Quinton De Kock ) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) यांच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर मोहसिन खानने ( Mohsin Khan) कमाल केली. लखनौ सुपर जायंट्सने २११ धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचे दोन्ही सलामीवीर मोहसिनने ( ३-२०) माघारी पाठवून संघासाठी निम्मी लढाई जिंकली. नितिश राणा, श्रेयस अय्यर व सॅम बिलिंग्स यांनी KKRकडून संघर्ष केला, परंतु त्यांना यश मिळाले नाही. रिंकू सिंग व सुनील नरीन यांनी अखेरच्या चेंडूपर्यंत खिंड लढवताना १ चेंडू ३ धावा असा सामना आणला होता. एव्हिन लुईसच्या वन हँडर कॅचने सामना फिरवला. लखनौने २ धावांनी हा सामना जिंकला. 

प्रत्युत्तरात KKRची सुरुवात निराशाजनकच झाली. मोहसिन खानने पहिल्याच षटकात KKRचा ओपनर वेंकटेश अय्यरला ( ०) बाद केले. क्विंटन डी कॉकने अफलातून झेल घेतला. त्यानंतर तिसऱ्या षटकात मोहसिनने LSGला दुसरे यश मिळवून देताना अभिजित तोमरची ( ४) विकेट घेतली. २ बाद ९ अशा अवस्थेत असणाऱ्या KKRला नितिश राणा व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी सावरले. या दोघांनी तुफान फटकेबाजी केली. नितिशने २२ चेंडूंत ९ चौकारांसह ४२ धावा कुटल्या आणि श्रेयससह तिसऱ्या विकेटसाठी २७ चेंडूंत ५६ धावांची भागीदारी केली. के गौथमने ही जोडी तोडताना नितिशला बाद केले. त्यांतर अय्यरला सॅम बिलिंग्सने उत्तम साथ दिली. KKR ने १० षटकांत ३ बाद ९९ धावा केल्या.

कोलकाताच्या फलंदाजांनीही १०च्या सरासरीने धावांचे सत्र सुरू ठेवले होते. त्यामुळे LSGच्या ताफ्यात चिंतेचेच वातावरण दिसत होते. श्रेयस व सॅम यांनी २५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १३व्या षटकात मोहसिनला पुन्हा गोलंदाजीला आणले आणि त्याने केवळ दोन धावा देत कमाल केली. याचा फायदा पुढील षटकात झाला. मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर  धावा व चेंडूंचं गणित जुळवण्यासाठी श्रेयसने उत्तुंग फटका मारला, परंतु दीपक हुडाने तो टिपला. सॅमसह त्याची ६६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. श्रेयसने २९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५० धावा केल्या. या विकेटनंतर KKRवर दडपण वाढलेले दिसले. 

त्यांना ३० चेंडूंत ७७ धावा करायच्या होत्या. रवी बिश्नोईने KKR ला मोठा धक्का देताना बिलिंग्सला ( ३६)  यष्टिचीत केले. मोहसिनने KKRचा शेवटचा आशास्थान आंद्रे रसेलला ( ५)  बाद केले.  मोहसिनने ४ षटकांत २० घावा देताना ३ विकेट्स घेतल्या. आवेश खान महागडा ठरला. त्याने ४ षटकांत ६० धावा दिल्या. सुनील नरीनने खणखणीत फटके मारताना KKRचा संघर्ष सुरू ठेवला होता. रिंकू सिंगचीही त्याला साथ मिळाली. त्यांना ६ चेंडूंत २१ धावा करायच्या होत्या. मार्कस स्टॉयनिसने ते षटक टाकले. रिंकूने पहिलाच चेंडू चौकार खेचला, नंतर षटकार खेचून LSGच्या डग आऊटमध्ये सन्नाटा पसरवला. या षटकारासह रिंकूने १६ चेंडूंत नरीनसह अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. २ चेंडूंत ३ धावा हव्या असताना रिंकूने जोरदार फटका मारला आणि एव्हिन लुईसने एकहाताने तितक्याच चतुराईने तो टिपला. रिंकू १५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारासह ४० धावांवर बाद झाला. स्टॉयनिसने अखेरच्या चेंडूवर उमेश यादवची विकेट घेत लखनौला २ धावांनी सामना जिंकून दिला. कोलकाताने ८ बाद २०८ धावा केल्या. 

प्रथम फलंदाजी करताना राहुल व क्विंटन या जोडीने KKR विरुद्ध मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या दोघांमुळे LSG ने एकही विकेट न गमावता २० षटकांत २१० धावांचा डोंगर उभा केला. आयपीएलच्या इतिहासात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकही विकेट न गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली.  तिसऱ्या षटकात पदार्पणवीर अभिजित तोमरने १२ धावांवर खेळत असलेल्या क्विंटन डी कॉकचा झेल टाकला. त्याचा फटका त्यांना बसला.  क्विंटन व लोकेश यांनी संपूर्ण २० षटके खेळून विक्रमांची नोंद केली. क्विंटन ७० चेंडूंत १० चौकार व १० षटकारांसह १४० धावांवर,  तर लोकेश ५१ चेंडूत ६८ धावांवर नाबाद राहिला. 

टॅग्स :आयपीएल २०२२लखनौ सुपर जायंट्सकोलकाता नाईट रायडर्सक्विन्टन डि कॉकलोकेश राहुल
Open in App