Join us  

IPL 2021: युवा कर्णधार कॅपिटल्सच्या जेतेपदाची अपेक्षापूर्ती करणार?

IPL 2021: १३व्या पर्वाचा उपविजेता : शानदार फलंदाजी, दमदार वेगवान मारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 4:30 AM

Open in App

नवी दिल्ली : आत्मविश्वास उंचावलेला युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आयपीएलमध्ये प्रथमच दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार आहे. मागच्या वर्षीच्या उपविजेत्या या संघाला पहिलेवहिले विजेतेपद मिळवून देण्याची मोठी जबाबदारी अर्थात त्याच्याच खांद्यावर असणार आहे. यूएईत अंतिम सामन्यात मुंबईकडून पराभूत झालेला हा संघ शानदार फलंदाजी आणि दमदार वेगवान माऱ्याच्या जोरावर यंदादेखील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातो.नियमित कर्णधार श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खांद्याच्या दुखापतीमुळे जखमी झाल्याने पंतकडे नेतृत्व सोपविण्यात आले. दिल्लीचा पहिला सामना १० एप्रिल रोजी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध मुंबईत खेळायचा आहे.महेंद्रसिंग धोनीच्या छत्रछायेतून बाहेर पडून स्वबळावर संघाला जेतेपद मिळवून देण्याची पंतकडे हीच संधी असेल. याद्वारे टी-२० विश्वचषकाच्या तयारीचीदेखील संधी राहील. धवनदेखील सलामीवीर या नात्याने स्वत:चे स्थान निश्चित करू शकणार आहे.नेतृत्वाच्या ओझ्याखाली आक्रमक फलंदाजीला फटका बसणार नाही, याची पंतला काळजी घ्यावी लागेल. याशिवाय नोर्खिया आणि रबाडा यांच्यावर विसंबून राहण्याची वृत्ती सोडावी लागेल. मागच्या वेळी नऊपैकी सात सामन्यात विजयी ठरलेला हा संघ नंतर सलग चार सामन्यात पराभूत झाला होता. त्यामुळेच आत्मसंतुष्ट होण्याच्या वृत्तीला मूठमाती द्यावी लागेल.दिल्ली कॅपिटल्स संघ शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, शिमरोन हेटमायेर, मार्कस स्टोयनिस, ख्रिस व्होक्स, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एन्रिच नोर्खिया, ईशांत शर्मा, आवेश खान, स्टीव स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकसान मेरिवाला, एम सिद्धार्थ, टॉम कुरेन आणि सॅम बिलिंग्स.संघाची बलस्थानेया संघाकडे शानदार फलंदाजी आणि दमदार वेगवान गोलंदाजी असल्याने एकमेव संतुलित संघ वाटतो. आघाडीच्या फळीत शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणेसारखे अनुभवी फलंदाज आहेत, मधली फळी पंत, मार्कस स्टोयनिस, शिमरोन हेटमायर व सॅम बिलिंग्स सांभाळतील. स्टीव्ह स्मिथच्या समावेशामुळे फलंदाजीला बळ लाभले. मागच्या पर्वात धवनने ६१८ धावा केल्या, तर पंतने अलीकडे ऑस्ट्रेलिया तसेच इंग्लंडविरुद्ध चमक दाखविली आहे. गोलंदाजीत द. आफ्रिकेचा कागिसो रबाडा मागच्या पर्वात ‘पर्पल कॅप ’विजेता आहे. एन्रिच नॉर्खियाचा मारादेखील शानदार आहे. ख्रिस व्होक्स, ईशांत शर्मा आणि उमेश यादव हे अनुभवी वेगवान गोलंदाज उपयुक्त ठरू शकतात.पर्यायी खेळाडूंचा मात्र अभाव- संघातील बलाढ्य खेळाडूंना पर्याय ठरू शकतील,असे खेळाडू राखीव फळीत नाहीत. याच कारणास्तव हा संघ नॉर्खिया आणि रबाडा यांना कधीही विश्रांती देऊ शकणार नाही. - यष्टिरक्षणात पंत जखमी झाला तरी वेगळा पर्याय उपलब्ध नाही. केरळचा विष्णू विनोद संघात आहे, मात्र त्याला अनुभव नाही. वेगवान गोलंदाज ईशांत आणि उमेश यादव आता वन डे आणि टी-२०त खेळत नाहीत.

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्सरिषभ पंत