Join us  

IPL 2021: सुरेश रैना ‘बरसला’; चेन्नईची आव्हानात्मक मजल, कुरेनचीही निर्णायक खेळी

IPL 2021 : वानखेडे स्टेडियमवर बऱ्याच काळानंतर रैनाची बॅट तळपली. याशिवाय मधल्या फळीत मोईन आणि अंबाती रायुडू यांनी चांगले योगदान दिले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 5:44 AM

Open in App

- अयाज मेमन

मुंबई : अनुभवी सुरेश रैना अखेर संघाच्या मदतीला धावला. त्याची अर्धशतकी खेळी तसेच मोईन अली, अंबाती रायुडू यांच्यासह रवींद्र जडेजा आणि सॅम कुरेन यांच्या फलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्सने शनिवारी आयपीएल-१४ च्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ७ बाद १८८ अशी आव्हानात्मक मजल गाठली. वानखेडे स्टेडियमवर बऱ्याच काळानंतर रैनाची बॅट तळपली. याशिवाय मधल्या फळीत मोईन आणि अंबाती रायुडू यांनी चांगले योगदान दिले.  तळाच्या स्थानावर जडेजा आणि कुरेन यांनी संघाला तारले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अपयशाची मालिका आजही कायम राहिली. तो खेळपट्टीवर येताच त्रिफळाबाद होऊन परतला.चेन्नईची सुरुवात खराब झाली. सात धावात त्यांचे दोन्ही सलामीवीर ऋतुराज गायकवाड (५) आणि फाफ डुप्लेसिस (००) माघारी परतले होते. उपकणर्धार सुरेश रैना आणि मोईन अली यांनी मात्र पडझड थांबविली. ३६ धावांचे योगदान देणाऱ्या मोईनने नवव्या षटकात अश्विनला लागोपाठ दोन षटकार ठोकले खरे मात्र त्यानंतर अश्विनने त्याला तंबूचा मार्ग दाखवला. अंबाती रायुडू आणि सुरेश रैना यांनी  तेराव्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले. रैनाने देखील स्वत:चे  अर्धशतक साकारले. रायुडू २३ धावा काढून परतला.१६ व्या षटकात रैना दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्याने चार  षटकार आणि तीन  चौकारांसह ५४ धावांची खेळी केली. रैनानंतर सर्वांची नजर असलेला कर्णधार धोनी मैदानात आला, मात्र  आवेश खानने त्याची दांडी गूल करूत  शून्यावर माघारी धाडले. सॅम कुरेनने अखेरच्या काही षटकात ३४ धावा काढल्या. जडेजा २६ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीकडून ख्रिस व्होक्स आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन  गडी बाद केले. 

-  दिल्लीने शिमरोन हेटमायर, मार्क्‌स स्टोयनिस, ख्रिस व्होक्स आणि टॉम कुरेन या चार तर चेन्नईने डुप्लेसिस, मोईन अली, सॅम कुरेन आणि ड्‌वेन ब्राव्हो यांना सामन्यात संधी दिली.- मैदानावर उतरताच अजिंक्य रहाणे याने १५० वा तर फिरकीपटू अमित मिश्रा याने शंभरावा आयपीएल सामना खेळण्याचा मान मिळविला.

टॅग्स :आयपीएल २०२१सुरेश रैना