Join us  

IPL 2021: सनरायजर्सच्या आशा मधल्या फळीवर; सलामी जोडी मजबूत

मधल्या फळीकडून होते निराशा, फिनीशरचीही उणीव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 5:44 AM

Open in App

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कामगिरीत सर्वाधिक  सातत्य राखणाऱ्या संघांपैकी एक सनरायजर्स हैदराबाद स्पर्धेच्या आगामी सत्रात मधल्या फळीतील फलंदाजीमध्ये सुधारणा करण्याच्या निर्धाराने सहभागी होईल. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली २०१६ मध्ये आपले एकमेव आयपीएल जेतेपद पटकाविल्यानंतर सनरायजर्स संघाने नेहमीच प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविले आहे, पण जेतेपद पटकावण्यात अपयशी ठरला. संघाला २०१७ मध्ये एलिमिनेटरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता तर त्यानंतरच्या वर्षी हैदराबाद संघ फायनलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध पराभूत झाला होता.आयपीएल २०१९ मध्ये आणि गेल्या वर्षी कोरोना व्हायरस महामारीमुळे यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० मध्ये संघाला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अनुक्रमे एलिमिनेटर व दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. संघाने २०२१ च्या मोसमासाठी प्रमुख खेळाडूंना रिटेन केले आहे आणि याच कारणामुळे यंदा आयपीएल लिलावामध्ये हा संघ विशेष सक्रिय नव्हता आणि त्यांनी काही बॅकअप खेळाडूंना विकत घेतले.गेल्या स्पर्धेत संघाला अनुभवहीन मधल्या फळीचा फटका बसला होता. कारण संघ प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा व अब्दुल समद यांच्यासारख्या खेळाडूंवर अवलंबून होता.संघाची मजबूत बाजू संघाच्या मजबूत बाजूचा विचार करता संघाचा समतोल सर्वात महत्त्वाची बाब आहे. विशेषत: आघाडीची फळी. संघात डेव्हिड वॉर्नर, जॉन बेयरस्टॉ, जेसन रॉय, केन विलियम्सन, मनीष पांडे व रिद्धिमान साहा यांच्यासारखे कुठल्याही गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध वर्चस्व गाजविण्यास सक्षम खेळाडू आहेत. वॉर्नर व बेयरस्टॉची सलामी जोडी आयपीएलच्या सर्वांत धोकादायक जोडीपैकी एक आहे. जेसन रॉयसुद्धा अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळवण्याचा दावेदार आहे, पण केवळ चार विदेशी खेळाडूंना खेळविण्याच्या नियमामुळे वॉर्नर व राशिद खान यांचे खेळणे निश्चित आहे. उर्वरित दोन खेळाडूंची निवड परिस्थितीनुसार करण्यात येईल. जेसन होल्डर आपल्या अष्टपैलुत्वामुळे  तर केन विलियम्सन आपल्या अनुभवामुळे दावेदार असतील.गोलंदाजी प्रभावीसंघाची गोलंदाजीची बाजू प्रभावी आहे. फिट होऊन पुनरागमन करणारा भुवनेश्वर कुमार व राशिद गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करतील. राशिदच्या फिरकीने आतापर्यंत अनेक दिग्गज फलंदातांना चांगलेच नाचवले आहे. तो सनरायजर्सच्या फिरकी आक्रमणाचे नेतृत्व करेल. अफगाणिस्तानचाच स्टार फिरकीपटू मुजीब-उर-रहमान व यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजन यांच्या उपस्थितीमुळे गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. ऑस्ट्रेलियविराधोतील मालिकेत भारताच्या विजयात वाटा उचललेल्या टी. नटराजन याचा देखील संघात समावेश आहे. तो देखील आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे. संदीप शर्मा यानेही मागच्या सत्रात चांगली कामगिरी केली होती. जेसन होल्डर देखील चांगली कामगिरी करू शकतो.फलंदाजीमध्ये फिनिशरची उणीव संघाची कमकुवत बाजू आहे. यूएईमध्ये झालेल्या यापूर्वीच्या आयपीएलमध्ये संघाची मधली फळीही कमकुवत भासली आणि अशा स्थितीत संघाची नजर विलियम्सनच्या अनुभवावर केंद्रित राहील. केदार, जेसन होल्डर  यांच्यासोबतच राशिद खान देखील काही वेळा उपयुक्त फटकेबाजी करु शकतो. यामुळे संघ मजबुत भासत आहे. राशिदने काही मोक्याच्या वेळी चांगली फटकेबाजी केली आहे. विजय शंकरला अष्टपैलू म्हणून उपयुक्त सिद्ध करावी लागेल. संघाने यावेळी केदार जाधवला जोडले आहे, पण सरावाच्या उणिवेमुळे महाराष्ट्राचा हा अष्टपैलू आपली उपयुक्तता सिद्ध करतो किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे.साहाला जर फलंदाजी क्रमामध्ये वरच्या स्थानी संधी मिळाली तर तो आपली छाप सोडू शकतो, तर मधल्या फळीत जाधव महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. पांडेकडेही  आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करीत राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी दावेदारी सिद्ध करण्याची चांगली संधी राहील.सनरायजर्स संघ आघाडीच्या फळीवर अधिक विसंबून असून ही त्यांच्यासाठी धोक्याची सूचना आहे. जर वॉर्नर, बेयरस्टॉ, पांडे व विलियम्सन प्रदीर्घ काळ फॉर्मबाबत संघर्ष करीत राहिले तर मधल्या व तळाच्या फळीवर दडपण येईल. गोलंदाजीमध्ये संघ राशिद व भुवनेश्वर यांच्यावर अधिक अवलंबून आहे.सनरायजर्स संघ  डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विलियम्सन, विराट सिंग, मनीष पांडे, प्रियम गर्ग, रिद्धिमान साहा, जॉनी बेयरस्टॉ, जेसन रॉय, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, केदार जाधव, जे सुचित, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी. नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बासिल थम्पी, शाहबाज नदीम आणि मुजीब उर रहमान.

टॅग्स :आयपीएल २०२१सनरायझर्स हैदराबाद