Join us  

IPL 2021, RR vs PBKS, Highlights: राहुल-मयांकची 'गट्टी', पण जमेना संघाची 'भट्टी'; राजस्थाननं अशी केली पंजाबची 'छुट्टी'!

IPL 2021, RR vs PBKS, Highlights: राजस्थाननं दिलेलं १८६ धावांचं खडतर आव्हान पंजाबचा संघ सहजपणे गाठत असतानाच अखेरच्या षटकात पंजाबनं माती केली आणि राजस्थाननं सामना दोन धावांनी जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:53 AM

Open in App

IPL 2021, RR vs PBKS, Highlights: दोन कोसावरुन मेहनतीनं घागर भरुन पाणी आणावं आणि इतरांनी तहान भागवण्याऐवजी पाय धुवून सारं पाणी वाया घालवावं अशीच काहीशी गत आज पंजाब किंग्जच्या संघाची झालेली पाहायला मिळाली. राजस्थाननं दिलेलं १८६ धावांचं खडतर आव्हान पंजाबचा संघ सहजपणे गाठत असतानाच अखेरच्या षटकात संघानं माती केली आणि राजस्थाननं सामना दोन धावांनी जिंकला. सामन्यात नेमकं काय घडलं? राजस्थाननं कुठं बाजी मारली ते जाणून घेऊयात... 

IPL 2021, RR vs PBKS, Highlights:

  • पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलनं सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररणाचा निर्णय घेत संघाच्या फलंदाजीवर पूर्णपणे विश्वास दाखवला. राजस्थाननं कितीही मोठं आव्हान उभारलं तरी आमची आव्हानाचा पाठलाग करण्याची तयारी आहे असं त्यानं ठरवलं होतं. राजस्थाननं दुबईच्या स्टेडियमवर सुरुवातीपासूनच हल्लाबोल करायला सुरुवात केली होती. 
  • सलामीवीर यशस्वी जयस्वालसोबत यावेळी राजस्थाननं मुंबई इंडियन्सचा जुना शिलेदार अॅलन लुईस याला उतरवलं होतं. दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत दमदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वालनं ३६ चेंडूत ४९ धावांची खेळी साकारली. यात २ खणखणीत षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे. तर लुईसनं २१ चेंडूत ३६ धावांचं योगदान दिलं. दोघांनी सलामीसाठी ५४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. 
  • टी-२० प्रकारात सध्या तुफान फॉर्मात असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनही १७ चेंडूत २५ धावांचं योगदान दिलं. राजस्थानच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवण्याचं काम महिपाल लोमरार यानं केलं. अवघ्या १७ चेंडूत ४ खणखणीत षटकार आणि २ चौकारांच्या साथीनं महिपालनं ४३ धावा कुटल्या.
  • अखेरच्या पाच षटकांमध्ये राजस्थानच्या धावसंख्येला लगाम घालण्यात पंजाबला यश आलेलं पाहायला मिळालं. महिपाल बाद झाल्यानंतर राजस्थानचा संपूर्ण संघ मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाला. रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, चेतन साकरिया, कार्तिक त्यागी यांना दोन अंकी आकडा देखील गाठता आला नाही.
  • सामन्याची खरी मेख तर पंजाबच्या डावात पाहायला मिळाली. आयपीएलमध्ये खोऱ्यानं धावा वसूल करणारी जोडी म्हणून ओळख निर्माण झालेल्या केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी आजही शतकी भागीदारी रचली. दोघांनी राजस्थानच्या नाकावर टिच्चून फलंदाजी केली आणि संघाला 'ड्रायव्हिंग सीट'वर नेऊन ठेवलं. 
  • आयपीएलमध्ये तब्बल ५ वेळा लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल जोडीनं शतकी भागीदारी रचण्याचा पराक्रम केला. दोघांनी सलामीसाठी १२० धावांची भागीदारी रचली. केएल राहुलनं ३३ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांच्या साथीनं ४९ धावा केल्या. तर मयांक अग्रवालनं ४३ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांचा नजराणा पेश करत ६७ धावा कुटल्या. दोघं बाद झाले पण त्यांनी त्यांचं काम केलं होतं. 
  • केएल राहुल आणि मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतर पंजाबकडून पदार्पण करणाऱ्या अॅडन मारकरम यानं जबाबदारीनं फलंदाजी केली खरी पण संघाला सामना गमावतानं त्यानं आज 'नॉन स्ट्राइक एंड'वरुन पाहिलं. तो २६ धावांवर नाबाद राहिला. निकोलस पुरन यानं ३२ धावा केल्या पण संघासाठी मॅच विनर त्याला ठरता आलं नाही. 
  • सामन्याच्या अखेरच्या षटकात ६ चेंडूत अवघ्या ४ धावांची गरज असताना सॅमसननं 'लकी चॅम्प' कार्तिक त्यागीला गोलंदाजी दिली आणि त्यानं पंजाबला जोरदार धक्के द्यायला सुरुवात केली. अखेरच्या षटकात विजयासाठी अवघ्या ४ धावांची गरज आणि हातात ८ विकेट्स असूनही पंजाबला जिंकता आलं नाही. खरंतर त्यागीनं जिंकून दिलं नाही असंच म्हणावं लागेल. त्यागीनं अत्यंत चलाखीनं गोलंदाजी केली. 
  • निकोलस पुरन याला तंबूत धाडलं. त्यानंतर आलेल्या दिपक हुडा याच्यापासून दूर चेंडू ठेवत त्यालाही त्यागीनं 'मामा' बनवलं. हुडा आल्यापावली माघारी परतला. त्यानंतर आलेल्या फॅबियन अॅलनलाही त्यागीचे चेंडू खेळता आले नाहीत आणि राजस्थाननं पंजाबचा तोंडचा घास हिरावून घेतला. राजस्थाननं सामना २ धावांनी जिंकला. केएल राहुल आणि मयांक यांच्या शतकी भागीदारीवर पाणी फेरलं गेलं. सलामीवीरांची गट्टी जमलेली असूनही पंजाबच्या संघाची भट्टी काही अद्याप जमलेली नाही हे पुन्हा एकदा आजच्या सामन्यात प्रकर्षानं दिसून आलं.  
टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सपंजाब किंग्सकार्तिक त्यागी
Open in App