Join us  

IPL 2021 : सिराजने डीव्हिलियर्सला म्हटले ‘एलियन’; ट्विट झाले व्हायरल

Mohammed Siraj : एबीने केलेली खेळी खऱ्या अर्थाने वादळी ठरली. यासाठीच आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याचा ‘एलियन’ असा उल्लेख केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 2:01 PM

Open in App

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने रविवारी सलग तिसरा विजय मिळवताना कोलकाता नाईट रायडर्सचा ३८ धावांनी धुव्वा उडवला. आघाडीची फळी अपयशी झाल्यानंतरही आरसीबीने दोनशे धावांचा पल्ला पार करत कोलकाताला भलेमोठे आव्हान दिले. यासाठी ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स यांच्या तडाखेबंद अर्धशतक आरसीबीसाठी महत्त्वपूर्ण ठरले. यातही एबीने केलेली खेळी खऱ्या अर्थाने वादळी ठरली. यासाठीच आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याचा ‘एलियन’ असा उल्लेख केला आहे.

कोलकाताविरुद्ध कर्णधार विराट कोहली, देवदत्त पडिक्कल आणि रजत पाटिदार हे तीन आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मॅक्सवेल आणि एबी यांनी ५३ धावांची वेगवान भागेदारी केली. मॅक्सवेलने ४९ चेंडूंत ७८ धावांचा तडाखा दिला, तर एबीने केवळ ३४ चेंडूंत ७६ धावा कुटल्या. दोघांनी प्रत्येकी ९ चौकार व ३ षटकार ठोकले. मॅक्सवेलने संघाच्या धावगतीला वेग दिला असला, तरी संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली ती एबीने. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत कोलकाताच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्याच्या वादळी खेळीमुळे आरसीबीला दोनशेचा पल्ला पार करता आला.त्यामुळेच सिराजनेही या विजयाचे श्रेय एबीला देताना त्याला एलियन असे म्हटले. 

याआधी आरसीबीनेही आयपीएल सुरु होण्याआधी जेव्हा एबी भारतात आला होता, तेव्हा ‘स्पेसशीप चेन्नईत लँड झाले आहे,’ असे म्हणत एबीला एलियन म्हटले होते. याला कारण म्हणजे, जेव्हा एबी फुल फॉर्ममध्ये बॅटिंग करतो, तेव्हा तो सर्वसामान्य क्रिकेटपटू भासत नाही. मैदानाच्या चौफेर बाजूने तो लिलया फटकेबाजी करताना अशक्य वाटणारा फटकाही सहजपणे खेळून जातो. त्यामुळेच तो एखाद्या परग्रहावरुन आलेला भासतो. त्यामुळेच सिराजने ट्विट केले की, ‘काय जबरदस्त खेळी झाली, ‘एलियन डीव्हिलियर्स आणि बिग शो’ ... संघाचा विजय’ सिराजच्या या ट्विटवर चाहत्यांनीही लाईक्स केले असून एबीच्या खेळीवर कमेंट्सचा पाऊस पाडला  आहे.   

टॅग्स :मोहम्मद सिराजआयपीएल २०२१