Join us  

IPL 2021, KKR vs DC, Live: कोलकाताची दिल्ली कॅपिटल्सवर ३ विकेट्सनं मात, राणा चमकला; व्यंकटेशची गोलंदाजीत कमाल  

IPL 2021, KKR vs DC, Live: दिल्ली कॅपिटल्सवर ३ विकेट्सनं दणदणीत विजय साजरा करत कोलकाता नाइट रायडर्सनं प्ले-ऑफमधील आपल्या दावेदारीचं आव्हान कायम ठेवलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 7:19 PM

Open in App

IPL 2021, KKR vs DC, Live: दिल्ली कॅपिटल्सवर ३ विकेट्सनं दणदणीत विजय साजरा करत कोलकाता नाइट रायडर्सनं प्ले-ऑफमधील आपल्या दावेदारीचं आव्हान कायम ठेवलं आहे. शारजाच्या मैदानात झालेल्या या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत २० षटकांच्या अखेरीस १२६ धावांवर रोखलं होतं. त्यानंतर कोलकातानं दिल्लीनं आव्हान ३ विकेट्स आणि ११ चेंडू राखून पूर्ण केलं. या विजयासह कोलकाताच्या खात्यात दोन गुणांची भर पडली आहे. कोलकाताचा संघ १० गुणांसह आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. 

कोलकाताकडून नितीश राणानं नाबाद ३६ धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. कोलकाताची सुरुवात निराशाजनक झाली होती. गेल्या तीन सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेला व्यंकटेश अय्यर (१४) यावेळी लवकर बाद झाला. तर शुबमन गिलनं दमदार फलंदाजी करत ३० धावा कुटल्या. राहुल त्रिपाठी देखील स्वस्तात बाद झाला. त्यानंतर अश्विननं कर्णधार मॉर्गनला शून्यावर बाद करत कोलकाताला मोठा धक्का दिला. त्यानंतर दिल्लीचा संघ सामन्यात पुनरागमन करण्याच्या स्थितीत होता. पण सुनील नरेन यानं विस्फोटक फलंदाजी करत सामन्याचं पारडं कोलकाताच्याच बाजूनं जड राहील याची काळजी घेतली. नरेनं यानं १० चेंडूत २१ धावा केल्या. यात २ षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. नरेन बाद झाल्यानंतर नितीश राणानं अखेरपर्यंत मैदानात टिच्चून फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. स्टीव्ह स्मिथ आणि शिखर धवन यांनी सलामीसाठी ३५ धावांची भागीदारी रचली. धवन २४ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर अवघी एक धाव काढून माघारी परतला. सुनील नरेन यानं अय्यरला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर ऋषभ पंतनं मैदानात जम बसवून डाव सावरला. अखेरच्या षटकांमध्ये ऋषभनं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यात काही यश येताना दिसलं नाही. खेळपट्टीवर चेंडू थांबून येत असल्याचा फायदा घेत कोलकाताच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यात मारा करत दिल्लीवर अंकुश ठेवला. दिल्लीकडून ललित यादव, अक्षर पटेल यांना तर खातंही उघडता आलं नाही. शिमरेन हेटमायर ४ धावा, तर रविचंद्रन अश्विन ९ धावा करुन बाद झाले होते.

टॅग्स :आयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App