Join us  

IPL 2021: विश्वकपच्या तयारीसाठी आयपीएल महत्त्वाची स्पर्धा, संघातील स्थानासाठी चांगली कामगिरी करावी लागेल

IPL 2021: मुंबईने सलग नवव्यांदा स्पर्धेत सलामी लढत गमावली. त्यात पाचवेळा ते चॅम्पियन ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 6:53 AM

Open in App

- अयाज मेमन(कन्सल्टिंग एडिटर) 

चेन्नईमध्ये रात्री फ्लॅड लाईटमध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार लढत अनुभवाला मिळाली. त्यामु‌ळे यंदाच्या आयपीएलमध्ये चढ-उतारासह रोमांचक लढती नक्कीच अनुभवाला मिळतील, हे स्पष्ट झाले. कोविडमुळे खेळाडूंमध्ये दहशत असल्याचे वृत्त होते, पण ते चुकीचे होते. महामारीबाबतच्या सर्व निराशा स्पर्धेच्या शानदार सलामी लढतीसह संपुष्टात आल्या. यात टी-२० क्रिकेटमधील सर्वच बाबी अनुभवता आल्या. जसे फलंदाजीमध्ये पॉवर व पंच आणि गोलंदाजीमध्ये धैर्य आणि कौशल्य.आरसीबीतर्फे हर्षल पटेल व एबी डिव्हिलियर्स यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. एकवेळ मुंबई संघ १८० पार मजल मारेल असे वाटत होते. पण पटेलने अखेरच्या षटकात तीन बळी घेत मुंबईला रोखले. त्याने एकूण पाच बळी घेतले आणि मुंबईला १५९ धावात रोखले.मुंबई संघ धावसंख्येचा यशस्वी बचाव करू शकेल असे वाटत होते. पण एबी डिव्हिलियर्सने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. मिस्टर ३६० डिग्रीच्या खेळीमुळे आरसीबीला विजय साकारता आला. डिव्हिलियर्स आयपीएल २०२० नंतर कुठले क्रिकेट खेळलेला नाही. पण, रनिंग बिटविनचा अपवाद वगळता त्याच्या खेळात कुठली उणीव भासली नाही.मुंबईने सलग नवव्यांदा स्पर्धेत सलामी लढत गमावली. त्यात पाचवेळा ते चॅम्पियन ठरले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला, ‘अंतिम लक्ष्य जेतेपद पटकावणे आहे.’ पहिल्या लढतीत दोन बाबींकडे लक्ष्य वेधणार आहे. पहिली बाब म्हणजे मोसमात आरसीबीच्या प्रवासाबाबत आणि आणि दुसरी बाब म्हणजे भारतीय टी-२० टीमबाबत. काही महिन्यानंतर टी-२० विश्वकप स्पर्धा होणार आहे. कोहली सलामीवीर म्हणून खेळत आहे. इंग्लंडविरुद्ध पांढऱ्या चेंडूच्या मालिकेत त्याने ते स्पष्ट केले होते. टी-२० विश्वकपमध्ये तो सलामीला खेळण्यास इच्छुक असून, त्यासाठी तो तांत्रिक व मानसिक रूपाने स्वत:ला सेट करण्यास प्रयत्नशील आहे. तो महत्त्वाची भूमिका बजावण्यास उत्सुक आहे. त्याच्यासोबत तो आक्रमक रणनीतीसह संघ तयार करण्यास उत्सुक आहे. तो सलामीवीराच्या भूमिकेत आला तर धवन व राहुल यांच्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. अव्वल सात स्थानांसाठी पंत, अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक, जडेजा, कृणाल, वॉशिंग्टन सुंदर हे सुद्धा दावेदार आहेत. त्यातील काही खेळाडूंना नक्कीच झळ बसेल.

अन्य काही खेळाडू असे आहेत की ज्यांची कामगिरी आयपीएलच्या सुरुवातीच्या लढतींमुळे प्रभावित होऊ शकते. उदाहरण द्यायचे झाल्यास युजवेंद्र चहलचे देता येईल. हा फिरकीपटू गेल्या काही दिवसामध्ये बळी न घेता महागडा ठरला आहे. हे कुणासोबतही घडू शकते, पण चहलसोबत ही सर्वसाधारण बाब आहे. राष्ट्रीय निवड समितीची नजरच ही धोक्याची घंटा ठरू शकते. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्येही चांगली चुरस आहे. केवळ फिरकी विभागातच दोन-तीन स्थानासाठी ९-१० गोलंदाज शर्यतीत आहेत. चहलने आयपीएलमध्ये स्वत:ला सिद्ध केले नाही तर त्याच्यासाठी भारतीय संघात स्थान मिळविणे कठीण होईल.

टॅग्स :आयपीएल २०२१