Join us  

IPL 2021: साखळी सामन्यांसाठी मुंबईतील चार स्टेडियम्सचा होतोय विचार; आयपीएल सामने मुंबई, अहमदाबादला?

कोरोनाचा प्रभाव ; आयपीएल सामने मुंबई, अहमदाबादला?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:46 AM

Open in App

मुंबई : गेल्या आठवड्यात झालेल्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेनंतर आता क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहेत ते आगामी आयपीएलचे. गतवर्षी कोरोनामुळे सप्टेंबर-नोव्हेंबरदरम्यान आयपीएलचे १३वे सत्र यूएईमध्ये आयोजित झाले. मात्र, यंदा आयपीएलचे आगामी १४वे सत्र भारतामध्येच आयोजित करण्याचे बीसीसीआयने ठरविले आहे. त्याच वेळी कोरोनाचा धोका पाहता यंदाचे सर्व सामने बीसीसीआयने मुंबई आणि अहमदाबाद येथेच खेळविण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साखळी सामन्यांचे आयोजन मुंबईतील चार स्टेडियममध्ये करण्यात येऊ शकते. तसेच, बादफेरीसह अंतिम सामन्याचे आयोजन अहमदाबाद येथील नव्या मोटेरा स्टेडियममध्ये करण्यात येईल. यंदाच्या आयपीएलला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून किंवा त्यानंतर सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने यंदाची आयपीएल केवळ ठरावीक स्टेडियममध्येच आयोजित करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉन स्टेडियम, डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि रिलायन्स क्रिकेट स्टेडियम अशी चार स्टेडियम्स आहेत. तसेच, सध्या जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपाला आलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये बाद फेरी व अंतिम सामना खेळविण्याचा विचार सुरू आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी नवे नाही. २०११ ला याच स्टेडियमवर भारताने विश्वचषक उंचावला होता. ब्रेबॉर्न स्टेडियमवर २०१८ ला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना झाला होता, तर रिलायन्स स्टेडियमवर रणजी सामने झाले असून अद्याप येथे आंतरराष्ट्रीय सामना खेळविण्यात आलेला नाही. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघाचे हे होमग्राउंड असून, येथे  मुंबई इंडियन्सचा संघ नियमित  सराव करतो.

डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवरही अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. २००९ ला येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. असे असले, तरी येथे २०१० ला आयपीएल सामने खेळविण्यात आले होते. शिवाय २०१७ ला १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक सामन्यांचे आयोजनही या स्टेडियमवर करण्यात आले होते.

आयपीएल एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून?

आयपीएल आयोजनाबाबत माहिती देताना सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘सध्या मुंबईतील चार स्टेडियमवर आयपीएल सामने आयोजनाची चर्चा सुरू आहे. यामध्ये वानखेडे, ब्रेबॉर्न, डॉ. डी. वाय. पाटील आणि रिलायन्स या चार स्टेडियम्सचा समावेश आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यासाठी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमचा विचार होऊ शकतो. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून, यंदाच्या आयपीएलला एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून किंवा त्यानंतर सुरुवात होण्याची शक्यता आहे.’

टॅग्स :आयपीएलबीसीसीआय