Join us  

IPL 2021 : आयपीएलमध्ये यष्टिरक्षक कर्णधारांच्या प्रथेचे श्रेय धोनीला , चार संघाचे नेतृत्व यष्टीरक्षकांच्या हाती

IPL 2021: धोनी चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार आहे तर पंजाब किंग्सने गेल्या मोसमात यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलकडे नेतृत्व सोपविले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 6:48 AM

Open in App

नवी दिल्ली :  आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आठपैकी चार संघांचे नेतृत्व यष्टिरक्षकांच्या हातात आहे आणि इंग्लंडचा यष्टिरक्षक व राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज जोस बटलरने याचे श्रेय महेंद्रसिंग धोनीला देताना म्हटले की, ‘युवा खेळाडू त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्यास प्रयत्नशील आहेत.’धोनी चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार आहे तर पंजाब किंग्सने गेल्या मोसमात यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलकडे नेतृत्व सोपविले. रॉयल्सने संजू सॅमसनची कर्णधारपदी नियुक्ती केली तर श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यामुळे दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंत करीत आहे. बटलर म्हणाला, ‘यष्टिरक्षक कर्णधाराच्या या प्रथेचे श्रेय धोनी व त्याच्या सिक्थ सेन्सने घेतलेल्या निर्णयांना जाते. तो शानदार कर्णधार असून अनेक खेळाडू त्याच्या यशाची पुनरावृत्ती करण्यास इच्छुक आहेत. यष्टी मागे कर्णधारपद सांभाळण्याचा अतिरिक्त लाभ मिळतो.’ बटलरला सॅमसनच्या नेतृत्वाखाली रॉयल्सकडून यंदाच्या मोसमात शानदार कामगिरीचा विश्वास आहे. बटलर म्हणाला, ‘यष्टिरक्षक  खेळावर चांगली नजर ठेवू शकतो. त्याला निर्णय घेताना सोपे जाते. आमच्याकडे यंदाच्या मोसमात विविधता असलेला संघ आहे. त्यात बेन स्टोक्स व ख्रिस मॉरिस यांच्यासारखे अष्टपैलू व नवा कर्णधार आहे. संजू प्रदीर्घ कालावधीपासून रॉयल्सचा भाग आहे. तो शांतचित्त व्यक्ती आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही आपल्या खेळाचा आनंद घेत चांगली कामगिरी करू, असा मला विश्वास आहे.’ इंग्लंडतर्फे ५० कसोटी, १४८ वन-डे व ७९ टी-२० सामने खेळणारा बटलर म्हणाला, ‘स्टोक्स यंदाच्या मोसमात आमच्या संघासाठी एक्स फॅक्टर ठरेल.’ बटलर पुढे म्हणाला, ‘क्रिकेट संचालक म्हणून श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकारा रॉयल्ससोबत जुळल्यामुळे बराच लाभ झाला. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आयपीएलचा मोठा अनुभव आहे. कुणाकडून काय अपेक्षा करायला हव्या, याची त्यांना चांगली कल्पना आहे.’

विदेशी खेळाडूंमध्ये पोलार्ड मिस्टर आयपीएलआयपीएलच्या महान खेळाडूंबाबत विचारले असता त्याने धोनी, सुरेश रैना व किरोन पोलार्ड यांचे नाव घेतले. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अंतिम चार दावेदारांमध्ये त्याने रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईटरायडर्स यांना संधी दिली.  तो म्हणाला, ‘धोनी व रैना सुरुवातीपासून खेळत आहेत आणि सर्वाधिक सामनावीर ठरले आहेत. विदेशी खेळाडूंमध्ये पोलार्ड टी-२० क्रिकेटचा आधार आहे. तो पहिल्या सत्रापासून खेळला नसला तरी मुंबई इंडियन्ससाठी यशस्वी ठरला आहे. तो विदेशी खेळाडूंमध्ये ‘मिस्टर आयपीएल’ आहे.’

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनी