Join us  

IPL 2021, CSK vs RCB : विराट कोहलीनं गोलंदाजांवर फोडलं पराभवाचं खापर, तर महेंद्रसिंग धोनीनं केलं CSKच्या बॉलर्सचं कौतुक!

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live चेन्नईनं १५७ धावांचे लक्ष्य १८.१ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 12:07 AM

Open in App

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) ६ विकेट्स राखून विराट कोहलीच्या संघाला पराभूत करून गुणतक्त्यात पुन्हा अव्वल स्थान काबीज केले. चेन्नईनं १५७ धावांचे लक्ष्य १८.१ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. 

विराट कोहली ( ५३) व देवदत्त पडिक्कल ( ७०) यांनी RCBला चांगली सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी १११ धावा जोडल्या. पण, त्यानंतर त्यांची गाडी घसरली. CSKच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करताना अखेरच्या १० षटकांत RCBला ६६ धावांत ६ धक्के दिले. ड्वेन ब्राव्होनं ३, शार्दूल ठाकूरनं २ आणि दीपक चहरनं १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड ( ३८), फॅफ ड्यू प्लेसिस ( ३१) , अंबाती रायुडू ( ३२), मोईन अली ( २३) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सुरेश रैना ( १७) व धोनी ( ११) हे नाबाद राहिले.

विराट कोहली काय म्हणतो?''आम्हाला १७५ धावा करायला हव्या होत्या, ते विजयी लक्ष्य ठरले असते. खेळपट्टीवर बरीच चांगली कामगिरी करण्यासारखी होती, परंतु गोलंदाजांनी निराश केलं. त्यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना चौकार खेचण्याच्या संधी दिल्या. त्याउलट चेन्नईच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली आणि गरज असताना यॉर्करचाही मारा केला. त्यामुळे आम्हाला मोठा फटका मारण्यासाठी वाईट चेंडूची वाट पाहावी लागत होती. पहिल्या पाच षटकांत X फॅक्टरच दिसला नाही आणि संधी हेरण्यातही आम्ही अपयशी ठरलो. पुन्हा विजयपथावर येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पहिल्या सामन्यापेक्षा हा पराभव अत्यंत निराशाजनक ठरला,'' असे विराट म्हणाला.  

महेंद्रसिंग धोनीनं काय सांगितले?''दव फॅक्टरची आम्हाला चिंता लागून राहिली होती आणि त्यामुळेच आम्ही लक्ष्याचा पाठलाग करण्याचे ठरवले. त्यांनी चांगली सुरुवात केली, परंतु ९व्या षटकानंतर विकेट संथ झाली. पडिक्कल फलंदाजी करत असताना रवींद्र जडेजानं उत्तम गोलंदाजी केली. त्यानंतर ब्राव्हो, जोश, शार्दूल, दीपक यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. आमच्या खेळाडूंनी कठोर मेहनत घेतली आणि प्रत्येकानं आपापली भूमिका व जबाबदारी चोख पार पाडली,''असे म्हणत धोनीनं खेळाडूंचे कौतुक केलं.  

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्स
Open in App