Join us  

IPL 2020: महिलांची आयपीएल जाहीर; मिताली, स्मृती अन् हरमनप्रीत करणार नेतृत्त्व

मिताली वेलोसिटी, स्मृती ट्रेलब्लेझर्स व हरमनप्रीत सुपरनोवास संघांचे नेतृत्त्व करतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 2:48 PM

Open in App

मुंबई : यूएईमध्ये सुरु असलेल्या यंदाची Indian Premier League (IPL 2020) अर्ध्या टप्प्यावर आली. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिलांच्या आयपीएलसाठी तीन संघांची घोषणा केली असून मिताली राज (Mithali Raj), स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांना कर्णधार नेमले आहे. मिताली वेलोसिटी, स्मृती ट्रेलब्लेझर्स व हरमनप्रीत सुपरनोवास संघांचे नेतृत्त्व करतील.

४ नोव्हेंबरपासून या तीन संघांचा समावेश असलेल्या महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेला सुरुवात होईल. ही स्पर्धाही यूएईमध्येच होणार असून ९ नोव्हेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडेल. महिलांच्या या स्पर्धेत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, श्रीलंका आणि न्यूझीलंड या देशातील खेळाडूंचाही समावेश असेल. त्याचप्रमाणे, थायलंडची नाथ्थाकन चानथाम हीदेखील यंदा महिला टी-२० चॅलेंजमध्ये खेळताना दिसेल. टी-२० विश्वचषक स्पर्धेत थायलंडकडून पहिले अर्धशतक झळकावताना चानथामने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे ही चॅलेंज टी-२० स्पर्धा खेळणारी चानथाम पहिली थाय खेळाडू ठरेल. स्पर्धेतील तिन्ही संघांची निवड भारताच्या महिला निवड समितीने केली.स्पर्धेतील संघ :

सुपरनोवास : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पूनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला सिरिवर्दने, पूनम यादव, शकेरा सेल्मन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकार, आयुषी सोनी, आयाबोंगा खाका आणि मुस्कान मलिक.ट्रेलब्लेझर्स : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पूनम राऊत, ॠचा घोष, हेमलता, नुजहत परवीन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, झूलन गोस्वामी, सिम्रन दिल बहादूर, सलमी खातून, सोफी, चानथाम, डिएंट्रा डॉटीन आणि केशवी गौतम.वेलोसिटी : मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका विद्या, सुश्री दिब्यादर्शनी, मनाली दक्षिणी, केसपेरेक, डॅनियल वॅट, सुन लुस, जहांआरा आलम आणि एम. अनागा.चार सामन्यांची मालिका

महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेत एकूण चार सामने खेळविण्यात येतील. यातील तीन सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होतील. तसेच स्पर्धेतील दुसरा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरु होईल. ४ नोव्हेंबरला सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी या सामन्याने महिलांच्या या स्पर्धेला सुरुवात होईल. ५ नोव्हेंबरला स्पर्धेचा दुसरा सामना वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स असा रंगेल. ७ नोव्हेंबरला ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज असा सामना होईल आणि ९ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळविण्यात येईल.

टॅग्स :IPL 2020महिलामिताली राज