Join us  

IPL 2020: धोनी म्हणतो, सीएसकेचा ‘हा’ अष्टपैलू आहे परिपूर्ण क्रिकेटपटू

IPL 2020: टीममधल्या तरुण खेळाडूचं धोनीकडून तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 3:07 PM

Open in App

मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. चांगल्या सुरुवातीनंतरही चेन्नईला काही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. सध्या गुणतालिकेत चेन्नई सहाव्या स्थानी असून ८ सामन्यांतून ३ सामने जिंकताना त्यांनी सहा गुण मिळवले आहेत. चेन्नईच्या आतापर्यंतच्या वाटचालीत काही खेळाडूंनी आपली छाप पाडत सर्वांनाच प्रभावित केले आहे. यामध्ये इंग्लंडचा अष्टपैलू सॅम कुरेन (Sam Curren) आघाडीवर असून कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यानेही कुरेनवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.मंगळवारी दुबई स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने सनरायझर्स हैदराबादला २० धावांनी नमविले. या सामन्यात कुरेनने डावाची सुरुवात करताना २१ चेंडूंत ३१ धावांची वेगवान खेळी खेळली. यानंतर गोलंदाजीतही छाप पाडताना त्याने १८ धावांत एक बळी घेतला.कुरेनच्या या कामगिरीनंतर खुद्द कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी यानेही कौतुक केले आहे. ‘कुरेन एक परिपूर्ण क्रिकेटपटू आहे,’ असे धोनीने सांगितले. सामना संपल्यानंतर धोनीने म्हटले की, ‘कुरेन एक परिपूर्ण क्रिकेटपटू आहे. प्रत्येक संघाला एका वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूची गरज असते. तो चेंडूला चांगल्याप्रकारे फटकावतो. कुरेन आघाडीच्या फळीत फलंदाजी करु शकतो आणि फिरकी गोलंदाजीही चांगल्या प्रकारे खेळू शकतो.’धोनी इतक्यावरच नाही थांबला. त्याने पुढे म्हटले की, ‘कुरेनला कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला पाठविता येईल. त्याची डावखुरी वेगवान गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला कायम अडचणीत आणते. तो संघाला वेगाने १० ते ४५ धावा काढून देऊ शकतो. जर लय मिळवायची असेल, तर कुरेनला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवावे लागेल आणि त्याचीही अशीच कामगिरी करण्याची इच्छा आहे.’

टॅग्स :IPL 2020महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स