Join us  

IPL 2020, KXIP vs RCB : मैदानाच उतरताच गेलचा पराक्रम, आयपीएलमध्ये २७ व्यांदा केला हा विक्रम

Chris Gayle News : आयपीएलमधील अर्धे सामने संपल्यानंतर मैदानात उतरलेला धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने आज यंदाच्या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात आपल्या बॅटचा इंगा दाखवला.

By बाळकृष्ण परब | Published: October 15, 2020 11:26 PM

Open in App

शारजा - आयपीएलमधील अर्धे सामने संपल्यानंतर मैदानात उतरलेला धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने आज यंदाच्या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात आपल्या बॅटचा इंगा दाखवला. बंगळुरूने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी धडाकेबाज सुरुवात करून दिल्यानंतर ख्रिस गेलनेही आश्वासक फलंदाजी केली. दरम्यान, शारजाच्या संथ खेळपट्टीवर गेलने स्फोटक खेळ केला नसला तरी षटकारांनी आतषबाजी करत आपल्या बॅटचा पराक्रम पुन्हा एकदा दाखवला.सलामीऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ख्रिस गेलने सुरुवातीला बचावात्मक फलंदाजी केली. मात्र खेळपट्टीवर जम बसल्यानंतर बंगळुरूच्या गोलंदाजांना झोडपून काढले. दरम्यान, ख्रिस गेलने पाच उत्तुंग षटकार ठोकले. आयपीएलमध्ये एका सामन्यात ५ हून अधिक षटकार ठोकण्याची ही गेलची तब्बल २७ वी वेळ होती.या लढतीत ४५ चेंडूत ५३ धावांची खेळी करताना ख्रिस गेलने आयपीएलमधील आपल्या चार हजार ५०० धावांचा टप्पाही पार केला आणि आयपीएलमध्ये साडे चार हजारांहून अधिक धावा करणाऱ्या मोजक्या फलंदाजांमध्ये स्थान पटकावले.दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये गुणतक्त्यात तळाला असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबने गुरुवारी अखेर आपली पराभवाची मालिका खंडित केली. मयांक अग्रवाल, लोकेश राहुल आणि ख्रिस गेल या तीन स्फोटक फलंदाजांनी केलेल्या घणाघातीत फलंदाजीच्या जोरावर पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ९ विकेट्स राखून मात केली. पंजाबचा हा यंदाच्या हंगामातील दुसरा विजय ठरला.बंगळुरूने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी जोरदार सुरुवात करून दिली. दोघांनीही बंगळुरूच्या गोलंदाजांना झोडपून काढले. मयांक आणि राहुलने पॉवर प्लेच्या पहिल्या ६ षटकांत ५६ धावा फटकावल्या. दरम्यान, युझवेंद्र चहलने मयांक अग्रवालला बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. मयांकने २५ चेंडून ४५ धावा फटकावल्या.मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतर लोकेश राहुल आणि ख्रिस गेलने आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली. गेल (५३) आणि राहुलने (६१) आपापली अर्धशतके पूर्ण करत पंजाबला विजयासमिप नेले. पंजाबला विजयासाठी एक धाव हवी असताना गेल धावचीत झाला. मात्र तोपर्यंत पंजाबचा विजय निश्चित झाला होता. शेवटी सामन्यातील शेवटच्या चेंडूवर निकोलस पूरनने खणखणीत षटकार ठोकत पंजाबला विजय मिळवून दिला. 

 

टॅग्स :IPL 2020ख्रिस गेलकिंग्स इलेव्हन पंजाबरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर